Maharashtra COVID19 Updates for today : गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात आली आहे. दररोज आढळणाऱ्या कोरोना रुग्णसंख्यामध्ये घसरण पाहायला मिळत आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूरसह मोठ्या शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे. काही जिल्ह्यात रविवारी एकही कोरोना रुग्ण आढळलेला नाही. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात एक हजार 437 नवे रुग्ण आढळले आहेत. शनिवारी राज्यात एक हजार 635 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. राज्यात कोरोना महामारीची तिसरी लाट ओसरली आहे. कारण मुंबई, पुणे जिल्हा, पुणे मनपा आणि अहमदनगर वगळता कोणत्याही जिल्ह्यात तीन आकडी रुग्णसंख्या नाही. तीन जिल्ह्यात एकही कोरोना रुग्ण आढळला नाही. तर 20 पेक्षा जास्त जिल्ह्यात फक्त एकेरी रुग्णवाढ आहे. दररोज कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्यामुळे राज्यातील कोरोना निर्बंध आणखी शिथिल होण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि टास्क फोर्सने याबाबतचे संकेतही दिले आहेत.


आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी राज्यात एक हजार 437 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर तीन हजार 375 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. याच कालावधीत सहा रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शनिवारी राज्यात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. दैनंदिन कोरोना रुग्णांप्रमाणे कोरोना मृत्यूच्या संख्येतही घट दिसत आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 1.82 टक्के झाला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.91 टक्के आहे.  सध्या राज्यात  2 लाख 4 हजार 942 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1068  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  


राज्यातील एकूण अक्टिव कोरोना रुग्णांची संख्या 16 हजार 422 इतकी आहे. राज्यात सात कोटी 72 लाख 32 हजार 001 कोरोना चाचण्या आतापर्यंत करण्यात आल्या आहेत. त्यापैकी राज्यात आतापर्यंत 78 लाख 58 हजार 431 कोरोना रुग्णाची नोंद झाली आहे. तर राज्यात आजपर्यंत 76 लाख 94 हजार 439 जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यात आतापर्यंत एक लाख 43 हजार 582 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 






मुंबईत रविवारी 167 रुग्णांची नोंद, एकही मृत्यू नाही - 
मुंबई महानगरपालिकेने (Mumbai BMC) दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मुंबईत 167 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 345 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दिलासादायक बाब म्हणजे रविवारी कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.  तसंच कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 3097 दिवसांवर आला आहे.  मंगळवारी कोरोना रुग्ण दुपटीचा कालावधी 2407 इतका होता. त्यामुळे सातत्याने मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचे दिसत आहे. रविवारी मुंबईतील 286 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आर्थिक राजधानीतील एकूण कोरोनामुक्त रुग्णांची संख्या 10,34,493 इतकी झाली आहे. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 98 टक्के इतका झाला आहे. मुंबईतील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 1151 इतकी झाली आहे. याशिवाय मुंबईतील साप्ताहिक कोरोना रुग्णवाढीचा दर ही 0.02% टक्के इतका झाला आहे. आज नव्याने आढळलेल्या 169 रुग्णांपैकी 19 रुग्णांनाच रुग्णालयात दाखल करण्यात आल्याने पालिकेकडील 36 हजार 317 बेड्सपैकी केवळ 819 बेड वापरात आहेत. 


महत्वाच्या बातम्या