K. Chandrashekar Rao : तेलंगणाचे मुख्यमंत्री  के. चंद्रशेखर राव (K. Chandrashekar Rao) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर जोरदार निशाणा लगावला आहे. मोदी सरकार राज्याच्या विकासासाठी पाठिंबा देत नाही. त्यामुळे त्यांना सत्तेतून खाली खेचणार असल्याचे चंद्रशेखर राव म्हणाले. तसेच गरज पडल्यास राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजावण्यास तयार असल्याचे ते म्हणाले. तुम्ही आम्हाला राष्ट्रीय प्रकल्प देऊ नका, तुम्ही आम्हाला वैद्यकीय महाविद्यालय देऊ नका, तुम्ही आम्हाला पाठिंबा दिला नाही तरी काही हरकत नाही. आम्ही तुम्हाला सत्तेपासून दूर करु आणि आम्हाला मदत करणारे सरकार सत्तेत आणू, असेही चंद्रशेखर राव म्हणाले.


जानगाव जिल्ह्यातील यशवंतपूर येथे जाहीर सभेत बोलताना केसीआर यांनी मोदी सरकारवर निशाणा लगावला. गरज भासल्यास दिल्लीचा किल्ला तख्त सर करण्यासाठी राष्ट्रीय राजकारणात भूमिका बजावण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. तेलंगणात एनडीए सरकारने प्रस्तावित केलेल्या वीज सुधारणांची अंमलबजावणी राज्य सरकार करणार नसल्याचेही देखील राव यांनी स्पष्ट केले. जर लोकांनी मला आशीर्वाद दिलात तर मी दिल्लीत जायला तयार असल्याचे राव म्हणाले. नरेंद्र मोदी सावध राहा असेही त्यांनी सांगितले.


पंतप्रधान मोदी यांनी शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे आश्वासन दिले होते. या आश्वासनाची राव यांनी खिल्ली उडवली आहे. वाढत्या इंधन आणि खतांच्या किमतींमुळे शेतकऱ्यांची गुंतवणूक दुप्पट झाली आहे. शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी काहीच करत नसल्याचे ते यावेळी म्हणाले. तसेच आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना जर कोणी हात लावला तर त्याला जशाच तसे उत्तर दिले जाईल असा इशारा देखील राव यांनी भाजपला दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या: