एकाच गुन्ह्यात दोन पोलिस ठाण्यात स्वतंत्र एफआयआर कसा? भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला कोर्टाचे निर्देश
Mumbai High Court : एकाच गुन्ह्यात दोन पोलिस ठाण्यात स्वतंत्र एफआयआर दाखल केल्याप्रकरणी भूमिका स्पष्ट करण्याचे राज्य सरकारला कोर्टाने निर्देश दिले आहेत.
मुंबई : ऑक्टोबर महिन्यात राज्य सरकारविरोधात नवी मुंबईत काढण्यात आलेल्या मोर्चाचं नेतृत्त्व करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेत्यांविरोधात एकाचवेळी दोन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्याविरोधात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve ), खासदार अरविंद सावंत ( Arvind Sawant ) आणि आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court ) धाव घेतली आहे. हा गुन्हा रद्द करण्याची मागणी करत न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायालयानं राज्य सरकारला (Maharashtra Government) भूमिका स्पष्ट करण्ये निर्देश देत सुनावणी 15 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाकडून 19 ऑक्टोबर रोजी सत्ताधारी पक्षाविरोधात आंदोलन करण्यात येणार होतं. यासाठी 17 ऑक्टोबर रोजी सीबीडी बेलापूर पोलिस स्टेशनकडे परवानगी मागितली होती. मात्र, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्मण होऊ नये म्हणून परवानगी नाकारण्यात आली होती. तरीही शिवसेनेकडून मोर्चा काढण्यात आला. त्यात 600 ते 700 शिवसैनिक सहभागी झाले होते.
या मोर्चानंतर मोर्चाचे नेतृत्व करणारे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार अरविंद सावंत आणि आमदार भास्कर जाधव यांच्याविरोधात नवी मुंबई पोलिसांनी सीबीडी बेलापूर आणि एनआरआय सागरी पोलिस ठाण्यामध्ये समान कलमं लावत दोन गुन्हे दाखल केलेत. त्याविरोधात शिवसेना नेत्यांनी अॅड. शुभम काहीटे यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी रीट याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्ती रेवती मोहिते- डेरे आणि न्यायमूर्ती आर. एन लढ्ढा यांच्या खंडपीठासमोर सोमवारी सुनावणी झाली. यावेळी एकाच गुन्ह्यातील कारवाईचं प्रकरण असताना दोन स्वतंत्र एफआयआर कसे असू शकतात? असा सवाल उपस्थित करत हायकोर्टानं राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. शिवाय या प्रकरणाची सुनावणी 15 डिसेंबरपर्यंत तहकूब केली आहे. त्यामुळे 15 डिसेंबर रोजी न्यायालय याबाबत काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिले आहे.
महत्वाच्या बातम्या