वस्तू आणि साहित्यांच्या किमतीपेक्षा जास्त भाडे अदा, कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप
कोरोना उपाययोजनांसाठी वस्तू आणि साहित्यांच्या किमंतीपेक्षा कितीतरी जास्त पटीने भाडे दिल्याची माहिती आता समोर आली आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी केला आहे.
सोलापूर : सोलापुरात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महानगरपालिकेतर्फे विविध उपाय योजना करण्यात आल्या. शहरात 12 एप्रिल रोजी कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कोरोनाने शहरात हळूहळू पाय पसरायला सुरुवात केला. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळत होते तो भाग प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तर प्रतिबंधात्मक क्षेत्रात नागरिकांचा वावर टाळण्यासाठी बॅरेकेडिंग, सीसीटीव्ही प्रणालीचा वापर देखील करण्यात आला.
शहरात करण्यात आलेल्या या उपाययोजनांसाठी लागणारे साहित्य आणि वस्तू हे भाडेतत्वावर घेण्यात आले होते. वस्तू आणि साहित्यांच्या किमंतीपेक्षा कितीतरी जास्त पटीने भाडे दिल्याची माहिती आता समोर आली आहे. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सोलापूर महानगरपालिकेच्या नगरसेवकांनी केला आहे. आपत्कालीन योजनेच्या नावाखाली कोणत्याही प्रकारच्या नियमांचे पालन न करता परस्पर बिले अदा कऱण्यात आली आहेत. त्यामुळे याची सविस्तर चौकशी करण्यात यावी अशी मागणी नगरसेवकांनी केली आहे.
12 जून ते 11 ऑगस्टपर्यंत कोरोना उपाय योजनांसाठी करण्यात आलेले खर्च
प्रतिबंधात्मक क्षेत्रात सीसीटीव्ही - 3 लाख 85 हजार रुपये आरोग्य तपासणी केंद्रासाठी रुग्णवाहिका - 72 हजार 150 रुपये भाजी मार्केटमध्ये पट्टे मारणे - 3 लाख 2 हजार 400 रुपये फवारणी करणे - 36 हजार रुपये प्रतिबंधात्मक क्षेत्रात बॅरेगेटिंग - 69 लाख 19 हजार 867 रुपये सफाई कर्मचाऱ्यांना चहा नाष्टा - 12 लाख 3 हजार 400 रुपये ज्येष्ठ नागरिकांना रिक्षाने ने-आण करणे - 48 हजार रुपये प्रिटिंग साहित्य खरेदी, फॉर्म छपाई - 12 लाख 57 हजार 355 रुपये खासगी वाहन भाड्याने लावणे - 2 लाख 43 हजार रुपये कम्युनिटी किचन येथून अन्नपुरवठा करणे - 4 लाख 49 हजार 982 रुपये औषध खरेदी - 16 लाख 3 हजार 734 रुपये क्वॉरंन्टाईन सेंटरला दूध आणि चहा - 2 लाख 45 हजार 490 रुपये आयुर्वेदिक काढा वाटप - 32 हजार 500 रुपये औषध फवारणी - 52 हजार रुपये बेडशीट, उशी आणि चादर पुरवणे - 1 लाख 19 जार 148 रुपये वाहन चालकांना जेवण पुरवणे - 1 लाख 97 हजार 990 रुपये डिजीटल बोर्ड पुरवणे - 1 लाख 56 हजार रुपये होळकर आणि वाडिया हॉस्पीटल स्पिटल दुरुस्ती - 2 लाख 88 हजार 376 रुपये जनजागृती - 30 हजार रुपये मास्क पुरवणे - 15 लाख 51 हजार 858 रुपये हात धुण्यासाठी पाणी टाकी पुरवणे- 5 लाख 32 हजार 199 एकूण खर्च - 1 कोटी 57 लाख 26 हजार 449 रुपये
"जर प्रशासनाने बॅरिगेटिंगसाठी लागणारे बांबू खरेदी केले असते तर 5 लाख रुपयात काम झाले असते. काम झाल्यानंतर पुन्हा ते विक्री केले असते तर 50 टक्के रक्कम वाचली असती. परंतु तसे न करता बॅरिगेटिंग साहित्य भाड्याने घेतले गेले आहेत. 4 ते 5 रुपयाला मिळणारे मास्कसाठी 11 रुपयाला खरेदी करण्यात आले आहेत. याकामात स्पष्ट भ्रष्टाचार झाल्याचं दिसून येत आहे." अशी प्रतिक्रिया एमआयएमचे नगरसेवक रियाज खरादी यांनी यावेळी दिली.
तर "महापालिकेची आर्थिक स्थिती आधिच खराब अशा पद्धतीने कोणत्याही नियमांचे पालन न करता खरेदी करणे अंत्यत चुकीचे आहे. काही सामाजिक संस्थांनी शहरात मोफत फवारणी केली होती. मात्र तरी देखील फवारणीसाठी बिले अदा करण्यात आली आहेत. आतापर्य़ंत 1 कोटीहून अधिक बिले अदा कऱण्यात आली आहेत. अजून बिले द्यायची आहेत. यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचं स्पष्ट असून संबधितांवर कारवाई करण्यात यावी. संबधित अधिकाऱ्यांच्या पगारातून हे पैसे वसूल करण्यात यावे" अशी मागणी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक बाबा मिस्त्री यांनी केली.
दरम्यान या प्रकरणी आम्ही मनपा आयुक्त पी. शिवशंकर यांच्याशी देखील बातचित केली. "कोरोनाच्या सुरुवातीच्या काळात तत्कालीन आयुक्तांनी काम लवकर व्हावेत यासाठी अधिकचे पैसे दिले असावेत. नगरसेवकांनी नेमके कशासाठी अधिक पैसे देण्यात आलेत याची सविस्तर माहिती दिल्यास चौकशी करता येईल. आपण रुजु झाल्यापासून साहित्य भाड्यावर न घेता खरेदी करण्यावर भर देण्यात आला आहे." अशी प्रतिक्रिया मनपा आयु्क्त पी. शिवशंकर यांनी दिली. महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत देखील खर्चाच्या विषयावर मोठा गदारोळ झाला होता. मात्र अद्याप या प्रकऱणाची चौकशी कऱण्यात आलेली नाही.