Eknath Shinde in Village: एकनाथ शिंदे अचानक दरे गावात का गेले? आदित्य ठाकरे आकाशाकडे पाहत म्हणाले, चंद्र दिसतोय का?
Eknath Shinde at Satara Dare Village: एकनाथ शिंदे शुक्रवारी संध्याकाळी तडकाफडकी साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी का निघून गेले असावेत, याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
मुंबई: महायुती सरकारच्या सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असताना काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शुक्रवारी संध्याकाळी अचानक साताऱ्यातील दरे या आपल्या मूळगावी निघून गेले होते. मुंबईत सत्तास्थापनेच्यादृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी सुरु असताना एकनाथ शिंदे इतक्या तडकाफडकी आपल्या गावी का निघून गेले, याबद्दल चर्चा रंगली होती. भाजपकडून अपेक्षित खाते पदरात पडत नसल्यामुळे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) नाराज झाल्याचेही सांगितले जात होते. त्यामुळे ते आपल्या गावी निघून गेल्याची माहिती समोर आली होती. मात्र, याविषयी ठाकरे गटाचे वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thakeray) यांनी एक वेगळीच शंका व्यक्त केली. एकनाथ शिंदे हे दरे गावात गेल्याविषयी आदित्य यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी आदित्य ठाकरे यांनी आकाशाकडे पाहत, चंद्र दिसतोय का?, असे विचारले. त्यानंतर आदित्य ठाकरे हसत-हसत निघून गेले. त्यामुळे आता राजकीय वर्तुळात आदित्य ठाकरे यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय, याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहेत.
आदित्य ठाकरे हे मुंबईतील जरीमातेचं दर्शन घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, महायुतीच्या सत्तास्थापनेबद्दल बोलून फायदा नाही. आम्ही आमच्या कामाला लागलो आहोत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले.
एकनाथ शिंदे नॉट रिचेबल, मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत?
एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे गावात गेले आहेत. शुक्रवारी संध्याकाळपर्यंत एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वर्षा बंगल्यावर निवडक नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यानंतर एकनाथ शिंदे साताऱ्याच्या दिशेने रवाना झाले होते. दरे गावात आल्यानंतर एरवी मुख्यमंत्री प्रसारमाध्यमांशी बोलतात. मात्र, काल एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर दरे गावात उतरल्यानंतर गावकऱ्यांशी जुजबी संवाद साधून काळजीवाहू मुख्यमंत्री तातडीने घरी निघून गेले. दरे गावात मोबाईल रेंज नसल्याची माहिती शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दिली. त्यामुळे आता एकनाथ शिंदे याठिकाणी शांतपणे बसून राजकीय पेचप्रसंगातून मार्ग काढतील. ते शनिवारी संध्याकाळपर्यंत एखादा मोठा निर्णय घेऊ शकतात, अशी माहिती संजय शिरसाट यांनी दिली. एकनाथ शिंदे दोन दिवस दरे गावात थांबून 1 किंवा 2 डिसेंबरला मुंबईत परततील, असे सांगितले जात आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, 5 डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. त्यापूर्वी महायुतीच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडले. या बैठकीत खातेवाटपासंदर्भात चर्चा होऊ शकते. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या मोबदल्यात गृहमंत्रीपदाची मागणी केली आहे. गृहमंत्रीपद दिले तरच आपण उपमुख्यमंत्रीपद स्वीकारुन सरकारमध्ये राहू. अन्यथा शिवसेनेचे आमदार महायुती सरकारला बाहेरुन पाठिंबा देतील, अशी भूमिका एकनाथ शिंदे यांनी घेतल्याचे समजते. त्यामुळे महायुती सरकारचा शपथविधी लांबणीवर पडल्याचे सांगितले जाते.
आणखी वाचा