कल्याण : मुंबईला कामानिमित्त जाणाऱ्या कर्मचाऱ्यांना कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत नो एन्ट्री करण्यात येणार आहे. येत्या 8 मे पासून हा नवा नियम लागू होईल. मागील काही दिवसात कल्याण डोंबिवलीतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मुंबईला जाणारे कर्मचारी आणि त्यातही पोलीस, आरोग्य कर्मचारी, पत्रकार यांचं प्रमाण वाढलं होतं.


आत्तापर्यंत केडीएमसीच्या हद्दीत आढळून आलेल्या 224 रुग्णांपैकी तब्बल 101 रुग्ण हे मुंबईला कामासाठी जाणारे कर्मचारी आणि त्यांचे नातेवाईक आहेत. त्यामुळे शहरात बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांमुळे कोरोना वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर या कर्मचाऱ्यांना शहरात येऊ न देण्याचा निर्णय केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी घेतला आहे.


या कर्मचाऱ्यांची राहण्याची व्यवस्था ते काम करत असलेल्या आस्थापनांनी करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहेत. यासाठी एक फॉर्म जारी करण्यात आला असून तो भरून केडीएमसीला मेलद्वारे पाठवावा लागणार आहे. त्यानंतर 8 मे पासून या कर्मचाऱ्यांना केडीएमसी हद्दीत प्रवेश बंदी करण्यात येणार आहे.


राज्यातील कोरोनाची सद्यस्थिती


राज्यात आज कोरोनाच्या 841 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 15,525 असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. दरम्यान, आज राज्यात 34 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी 26 जण मुंबईचे तर पुण्यातील 6 आणि औरंगाबाद, कोल्हापुरात प्रत्येकी एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 617 जणांचा मृत्यू झाला आहे. आज 354 कोरोनाबाधित रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


संबंधित बातम्या 




 Coronavirus | ज्येष्ठांपाठोपाठ वजन जास्त असलेल्यांना कोविडचा धोका