मुंबई : लॉकडाऊन लागायच्या आत पहिल्यांदा बंद झालं होतं ते शूटिंग. टीव्ही, सिनेमा अशी सगळी शूटिंग्ज 17 मार्चलाच थांबली. म्हणजे लॉकडाऊन सुरु व्हायच्या आत बंदला सुरुवात झाली ती मनोरंजन विश्वापासून आणि सगळ्यात शेवटी लॉकडाऊन उठेल तोही याच इंडस्ट्रीचा. संपूर्ण लॉकडाऊनंतर महाराष्ट्राची झोनल विभागणी झाली. हिरव्या आणि भगव्या झोनमधल्या काही काही गोष्टी सुरु झाल्या. तशी मनोरंजनसृष्टीत जान यायाल सुरुवात झाली आहे. अशातच सोमवारी (5 मे) सिंटा आणि फ्वाईस यांच्या एक व्हर्च्युअल बैठक पार पडली आहे.
सिंटा म्हणजे सिने आणि टीव्ही आर्टिस्ट असोसिएशन आणि फ्वाईस म्हणजे फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिनेएम्प्लॉइज यांच्या पदाधिकाऱ्यांची काल (4 मे) पहिली बैठक पार पडली. अनेक मोठी माणसं यात होती. तर या मीटिंगमध्ये चर्चा करताना येत्या जुलैमध्ये कदाचित चित्रीकरणाला परवानगी मिळू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात आली. अर्थात भारत सरकार, राज्य सरकार काय निर्णय घेतात त्यावर अवलंबून असणार आहे. तरी अशीच ढोबळमानाने जर जुलै पकडला तर काय करावं लागेल त्याबद्दलही विचारणा झाली, सल्ले घेतले गेले. यात कोरोनाच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही काळजी सेटवर घ्यायला हवी यावर एकमत झालं आहे. या बैठकीतून कळलेले मुद्दे असे...
या व्हर्च्युअल बैठकीत काही सूचना घेतल्या गेल्या यातल्या सूचना अशा,
1. सेटवर आलेल्या प्रत्येकाची स्वॅब चाचणी होणार.
2. सेटवर सॅनिटायझर असावेत.
3. प्रत्येकाच्या सेटवर एक डॉक्टर आणि नर्स याचं पथक असावं
4. निर्मात्याने 12 तासाच्या शिफ्टमध्ये प्रत्येकाला चार मास्क द्यावेत.
5. नायिकांनी आपली रंगभूषा आणि केशभूषा घरातून करुन यावी
6. प्रत्येक मोठ्या कलाकाराचा एक माणूसच सेटवर असेल
7. 60 वर्षावरील कोणीही कर्मचारी सेटवर नसावा
8. प्रत्येकाचं टेम्प्रेचर रोज चेक केलं जावं.
याबद्दल माहिती देताना सिंटाचे सचिव अमित बहल एबीपी माझाशी बोलताना म्हणाले, "आता काहीच सांगता येणार नाही. कारण काल आमची पहिली बैठक झाली. त्याच्यामध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी केवळ सूचना मांडल्या. आता त्यावर चर्चा होईल. त्याचा ड्राफ्ट होईल. त्यानंतर माननीय मुख्यमंत्री काय निर्णय घेतात तो पाहिला जाईल. त्यानंतर आम्ही आमचं अधिकृत पत्र जाहीर करु. सोमवारच्या बैठकीत केवळ सूचना आल्या. याबद्दल कोणतीही अधिकृत गोष्ट अद्याप ठरलेली नाही अजून आम्ही मराठी चित्रपट महामंडळ, मराठी नाट्यपरिषद यांच्याही बोलणार आहोत. त्यानंतरच काही गोष्टी ठरवू."
या बैठकीत एकूण आढाव घेतला गेला. शिवाय अनेक मोठे सिनेमांचं शूट बंद आहे त्यावरही चर्चा झाली. त्यात जुलैमध्ये शूट सुरु होईल असा निष्कर्ष काढला गेला आहे. याबद्दलही बहल म्हणाले, ''कोरोनाचा प्रादुर्भाव आपण सगळेच जाणतो. त्यामुळे राज्य सरकारकडून हिरवा कंदील आल्याशिवाय आम्ही काहीही निर्णय घेणार नाही. उद्या जेव्हा-केव्हा लॉकडाऊन उठेल त्यानंतर काय करायचं त्याची ही चर्चा होती आणि चर्चाच चालू आहे.