बीड : कोरोना व्हायरसची तपासणी करण्यासाठी रुग्णालयात आणलेले दोन कैदी फरार झाल्याची घटना बीडमध्ये घडली आहे. या दोन्ही कैद्यांवर गंभीर स्वरुपाच्या गुन्हांची नोंद आहे. बीड शहराच्या जिल्हा रुग्णालयातून या कैद्यांनी पळ काढला आहे.


कारागृहात असलेल्या कैद्यांना कोरोना तपासणीसाठी बीड शहरातील जिल्हा रुग्णालयात दाखल केलं होतं. त्यांचा स्वॅब पाठवल्यानंतर सुरक्षा यंत्रणेला चकवा देत संबंधित दोन्ही कैदी जिल्हा रुग्णालयातून फरार झाले. सोमवारी रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विशेष म्हणजे डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा स्वॅब घेतला आहे.


सिरसाळा येथील हे दोन आरोपी जिल्हा कारागृहात खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी शिक्षा भोगत होते. काल त्यांना जिल्हा रुग्णालयात कोरोनाची तपासणी करण्यासाठी दुपारी पोलिस बंदोबस्तात आणण्यात आलं. यावेळी संबंधित डॉक्टरांनी त्यांना तपासून त्यांचा स्वॅब घेतला. यानंतर परत कारागृहात पाठवण्यासाठी त्यांचा स्वॅब येण्याची वाट पाहावी लागत होती. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयातच ठेवण्यासाठी पोलीस वार्डात घेऊन गेले.


मात्र तो वार्ड दुसरीकडे शिफ्ट झाल्याचे पोलिसांना सांगण्यात आले. त्यावेळी रात्रीचा अंधार आणि गोंधळाचा फायदा उचलत दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांनी आरोपीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते सापडले नाहीत. याप्रकरणी शहर ठाण्यात आरोपी फरार झाल्याची तक्रार पोलिसांनी दाखल केली आहे. दरम्यान पोलिसांनी या आरोपींना पकडण्यासाठी पथकांची स्थापना केली आहे.


संबंधित बातम्या 




 Coronavirus | ज्येष्ठांपाठोपाठ वजन जास्त असलेल्यांना कोविडचा धोका