पुणे : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणी आधीच अडचणीत आलेल्या हवगणे कुटुंबाला आणखी एक धक्का बसला आहे. जेसीबी खरेदी विक्रीच्या प्रकरणी एका व्यक्तीची 11 लाखांची फसवणूक आणि त्याला बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी लता आणि शशांक या मायलेकांना 6 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रशांत येळवंडे यांनी जेसीबी खरेदीच्या व्यवहारात तब्बल 11 लाख 70 हजार रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात केली होती. 

जेसीबी विक्रीमध्ये 11.70 लाखांची फसवणूक

शशांक आणि त्याची आई लता हगवणेनं जेसीबी विक्रीच्या नावाखाली प्रशांत येळवंडे नावाच्या व्यक्तीची फसवणूक केल्याचं समोर आलं आहे. प्रशांत यळवंडेनं जेसीबी विक्रीसाठी अॅडव्हान्स आणि कर्ज फेडण्यासाठी दिलेले तब्बल 11 लाख 70 हजार रुपये हगवणेंनी परत केले नाहीत. उलट पिस्तूलाचा धाक दाखवून आता पैसे मागू नकोस, नाहीतर घरचे नीट राहणार नाहीत अशी धमकी दिली होती. 

या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तो जेसीबी जप्त केला होता. पण जप्त केलेला जेसीबी हगवणेंकडे पुन्हा कसा आला याचा शोध म्हाळुंगे पोलिस घेत आहेत. ज्या गोडाऊनमध्ये हा जेसीबी होता त्या गोडाऊन मालकाकडे ही आता संशयाची सुई आहे. लता आणि शशांक हगवणेला याप्रकरणी 6 जून पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. 

न्यायालयात काय युक्तिवाद झाला? 

तपास अधिकारी :

- जेसीबी खरेदीचा करारनामा आरोपींकडे आहे, तो हस्तगत करायचा आहे.- खरेदीची ओरिजिनल कागदपत्रे आरोपींकडे आहेत. ते नंतर देऊ असं ते वारंवार म्हणत आलेत. त्यामुळं आम्ही ते आताच सादर करु शकत नाही. त्याचाच शोध घ्यायचा आहे. - आरोपींनी तक्रारदाराला पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावले आहे.  

सरकारी वकील :

- जेसीबी 24 लाखांना घ्यायचे ठरले. त्यापैकी 5 लाखांचे चेक दिले. नंतर कर्ज फेडण्यासाठी दरमहा 50 हजार रुपये दिलेत. असे एकूण 11 लाख 70 हजार दिलेत.- काही महिन्यांनी बँकेच्या एजंटने जेसीबी जप्त केला अन् आरोपीने जेसीबी स्वतःच्या ताब्यातही घेतला.- नंतर पैसे मागायला गेले असता अपमानास्पद वागणूक दिली. बंदुकीचा धाक ही दाखवत कुटुंबाला सोडणार नाही, अशी धमकी ही दिली.- मे 2024 मध्ये पोलिसांकडे तक्रात केली, तेव्हा पैसे देतो असं आरोपी म्हणाला. प्रत्यक्षात पैसे दिलेच नाही.- जे लोक जेसीबी जप्त करायला आले होते, ते कोण होते? कुठून आले होते? याचा तपास करायचा आहे.- दिलेली रक्कम कुठं आहे आणि ते वसूल करायचे आहेत.- या प्रकरणात कोणी-कोणी साथ दिली, याचा शोध घ्यायचा आहे.- पिस्तुल परवानाधारक आहे का? याचा तपास करायचा आहे.

आरोपीचा वकील :

- जेसीबी अथवा इतर मशनरी भाडे तत्वावर दिलं जातं. त्याप्रमाणे हे जेसीबी भाडे तत्वावर दिले होते. उलट त्यांनी अपुरे भाडे दिले.- जर त्यांनी जेसीबी खरेदी केला असेल तर करारनामा कुठं आहे? किमान फोटो तरी हवा होता? आता कोणती तरी कागदपत्रे सादर करुन हगवणे यांना फसवण्याचा प्रयत्न आहे.- हगवणे कुटुंबावर जे संकट आलेलं आहे, त्याचा गैरफायदा घेऊन त्यांना अडकविण्याचा प्रयत्न होतोय.- बंदूक परवानाधारक आहे, हे माध्यमांमध्ये आलेलं आहे.- उलट 5 ते 10 लाख रुपये प्रशांत येळवंडे यांच्याकडून येणं बाकी आहे.- हे फक्त षडयंत्र आहे. हगवणे कुटुंबाला जास्तीतजास्त तुरुंगात ठेवण्याचा हा प्रयत्न आहे.- बँकेचा जो एजंट आहे, त्याच्याकडे स्वतंत्र चौकशी करता येऊ शकते. यासाठी पोलिस कोठडीची गरज नाही. हगवणे माय-लेकाला न्यायालय कोठडी द्यावी.