राज्यातील मंदिरांमध्ये मास्कची एन्ट्री! चीनमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे खबरदारी
coronavirus mask rules: ख्रिसमस आणि नवीन वर्षातील सलगच्या सुट्ट्यांचं निमित्त साधून भाविक महाराष्ट्रातल्या मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे..
coronavirus mask rules: ख्रिसमस आणि नवीन वर्षातील सलगच्या सुट्ट्यांचं निमित्त साधून भाविक महाराष्ट्रातल्या मोठ्या मंदिरांमध्ये गर्दी करण्याची शक्यता आहे.. त्याच पार्श्वभूमीवर आता राज्यातल्या महत्त्वाच्या मंदिर प्रशासनांनी मास्क संदर्भात निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. परदेशातील कोविड प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्कचा वापर करावा, सोशल डिस्टन्सिंग पाळावं आणि सॅनिटायझरचा वापर करण्याचं आवाहन केलंय... तर कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरात उद्यापासून कर्मचाऱ्यांसाठी मास्कसक्तीचा निर्णय घेण्यात आलंय... पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं निर्णय घेतलाय... पण भाविकांना मात्र अद्याप मास्कसक्ती केलेली नाही. तिकडे पंढरपुरातील विठ्ठल मंदिरात मास्क संदर्भातला निर्णय उद्या होण्याची शक्यता आहे..तिकडे मुंबईतील मुंबा देवी मंदिरातील कर्मचा-यांना मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्यात. शिवाय भाविकांनाही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात येतं आहे. राज्यातील महत्वाच्या मंदिरात मास्कबाबत काय निर्णय घेण्यात आलाय, ते पाहूयात..
मास्क वापरण्याचं आवाहन -
कोविड संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शिर्डीचे साईबाबा संस्थान सतर्क झालं आहे. दर्शनाला येणाऱ्या साई भक्तांनी मास्क वापरावा, असे आवाहन मंदिरामार्फत करण्यात आले आहे. सोशल डिस्टनसिंगसह सॅनिटायझरचा वापर करावा, ज्यांनी बूस्टर डोस घेतलेले नसतील त्यांनी ते घ्यावेत. कोविडचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन साई संस्थानचे प्रभारी कार्यकारी अधिकारी राहुल जाधव यांनी केले आहे.
अंबाबाई मंदिरात मास्कशिवाय कर्मचाऱ्यांना प्रवेश नाही -
करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात कर्मचाऱ्यांसाठी (Ambabai Mandir Kolhapur) मास्क सक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, भाविकांसाठी अजून कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने हा निर्णय घेतला आहे. जगभरात वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पावणे दोनशे कर्मचाऱ्यांना उद्यापासून मास्क सक्तीचा होणार आहे.
दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थानाचा काय निर्णय?
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती देवस्थान मध्ये दर्शनाला निघाला असाल तर आधी मास्क घालावा लागणार आहे. गणेशभक्तांनी दर्शनासाठी येताना मास्क वापरण्याचे आवाहन मंदीर प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तातडीने गणेशभक्तासांठी पाच हजार मास्क खरेदी करण्यात येणार आहेत. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मंदीर प्रशासनाच्यावतीने ज्या भाविकांकडे मास्क नाहीत अशांना मास्क मोफत वाटले जाणार आहेत. मास्क वापरा असे सूचना फलकावर लावून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदीर प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे.