'गाव करी ते, राव काय करी'; जळगावातील चोपडा तालुक्यात लोक सहभागातून ऑक्सिजन प्लांटची उभारणी
कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यावर चोपडा परिसरातील शेतकऱ्यांसह, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थानी पुढाकार घेत चोपडा जिल्हा उप रुग्णालयात बारा लाख रुपये खर्च करीत ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली.
जळगाव : कोरोना काळात अनेक संकटांचा सामना आपण सगळ्यांनीच केला आहे. कोरोना संकटात अनेक गोष्टींसोबतच माणुसकीचंही दर्शन आपल्याला पाहायला मिळालं. अनेकांनी पुढे येत समाजपयोगी गोष्टी केल्याचं पाहायला मिळालं. असाच काहीसा प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात पाहायला मिळाला. म्हणतात ना, 'गाव करी ते, राव काय करी' याचा प्रत्यय चोपडा तालुका वासियानी दिला आहे.
कोरोनाच्या काळात अनेक रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यावर चोपडा परिसरातील शेतकऱ्यांसह, विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थानी पुढाकार घेत चोपडा जिल्हा उप रुग्णालयात बारा लाख रुपये खर्च करीत ऑक्सिजन प्लांटची उभारणी केली. चोपडा तालुक्यातील नागरिकांनी उचललेल्या पावलामुळे सगळ्यांसमोर आदर्श निर्माण केला आहे. लोक सहभागातून अशा प्रकारचा उभारण्यात आलेला हा पहिलाच ऑक्सिजन प्लांट असल्याचं सांगितलं जात आहे.
कोरोनाची पाहिली लाट आली आणि रुग्ण संख्या वाढू लागल्यानंतर आरोग्य यंत्रणेवर मोठ्या प्रमाणावर ताण आला. यामध्ये प्रामुख्याने कोरोनाबाधित रुग्णांना लागणारा ऑक्सिजन हा ग्रामीण भागातील रुग्णालयात उपलब्ध नसल्याने रुग्णांना उपचारासाठी शहरात जावं लागत असे, या काळात रुग्णांचा प्रवास हा अतिशय जोखमीचा असल्याने अनेक रुग्णांनी प्राण सोडल्याच्या घटना समोर आल्या होत्या. अतिशय कमी काळात हे सर्व घडत असताना शासनाच्या मर्यादा लक्षात आल्यावर चोपडा तालुक्यातील शेतकरी संघटनेचे नेते एस. बी. नाना पाटील यांनी पुढाकार घेत शासकीय रुग्णालयात कमी असलेल्या सुविधांसाठी निधी देण्याचं आवाहन जनतेला केलं. त्याचा सकारात्मक परिणाम म्हणून ग्रामीण भागातील अनेक शेतकऱ्यांसह अनेकांनी आपल्या आपल्या ऐपतीप्रमाणे रक्कम जमा केली होती. आतापर्यंत तीस लाखांचा निधी लोक सहभागातून उभा राहिला आहे.
दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असल्याचे लक्षात आल्यावर ऑक्सिजन प्लांट उभारणीसाठी प्रयत्न करण्यात आले होते. ग्रामीण भागातील लोकांनी केलेल्या या प्रयत्नाला यश आल्याच पाहायला मिळत असून बारा लाख रुपये खर्चाचा ऑक्सिजन प्लांट लोकसहभागातून चोपडा उप जिल्हा रुग्णालय परिसरात उभारण्यात आला आहे. या प्लांटमधून दररोज सव्वाशे लीटर ऑक्सिजनची निर्मिती केली जात असून तीस रुग्णांना चोविस तास पुरेल एवढा ऑक्सिजन आता मिळत असल्याने चोपडा उप जिल्हा रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा भासत नाही. त्यामुळे या परिसरातील जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. लोक सहभागातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन निर्मिती करणारा हा देशातील पहिलाच प्लांट असल्याचं मानलं जात आहे.
ऑक्सिजन प्लांटसाठी बारा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. या सोबतच चोपडा उप जिल्हा रुग्णालयात असलेल्या अनेक साधन सामग्रीची खरेदी ही लोकसहभागामधून करून देण्यात आली आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या उपचारासाठी रूग्णांना आता जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासणार नाही. कारण अगोदरच मोठ्या आर्थिक अडचणीत असताना शहरात जाऊन उपचार घेणं हे ग्रामीण भागातील जनतेच्या दृष्टीने अवघड होते, त्यामुळे गावकऱ्यांनी उचललेल्या या पावलामुळे गरजुंना मोठा दिलासा मिळणार आहे.
हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या या ऑक्सिजन प्लांटमुळे चांगल्या प्रतीच्या ऑक्सिजनची निर्मिती केली जात आहे. याचा उपयोग आम्ही आयसीयुमध्ये असलेल्या रुग्णांसाठी करत आहोत. त्याचा चांगला फायदा त्यांना होत आहे. पुढील काळात देखील अधिकाधिक रुग्णांना याचा फायदा होईल, असा विशवास वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज पाटील यांनी व्यक्त केला आहे.
चोपडा उप जिल्हा रुग्णालयात रुग्णांवर उपचार करताना शासकीय पातळीवर काही साधनं सामग्रीचीही उणीव भासत होती. ती लोक सहभागातून उभारण्यात आली आहे. यासाठी शेतकरी कृती समितीचे नेते एस. बी नाना पाटील यांनी पुढाकार घेऊन लोकसहभागामधून ऑक्सिजन प्लांटची निर्मिती पाहता या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्याचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. त्यांनीं उभारलेल्या या प्लांटचा फायदा सर्वच रुग्णांना मिळणार असल्याचे तहसीलदार अनिल गावित यांनी म्हटल आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :