लॉकडाऊनच्या अडीच महिन्यांत विकले तब्बल 20 टन अंजीर
पुण्याजवळील दौंड तालुक्यातील खोर या छोट्या गावातील समीर डोंबे या युवकाचा इंजिनीअर ते कृषी क्षेत्रातील उद्योजक असा प्रवास आहे.
पुणे : लॉकडाऊनच्या काळात अनेक जण सध्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सर्वात मोठी अडचण ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची या काळात झालेली दिसून येत आहे. या काळात शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीला आलेला शेतमाल ग्राहकांपर्यंत पोहचवण्यात अनेक अडचणी शेतकऱ्यांना आल्या. इतर व्यवसायीकांप्रमाणे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. या परिस्थीतीवर पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील खोर येथील समीर डोंबे या अभियंता तरुणाने यावर मात केली.
समीर हा बी ई मेकॅनिकल पदवीधर असून त्यांनी आपले भवितव्य अंजिराच्या शेतीत अजमावले आहे त्यांना अंजिराच्या शेती व्यवसायात मोठे यश देखील आले आहे. स्वतःची विपनन व्यवस्था निर्माण करत वीस टन अंजीराची सुरक्षीत विक्री केली. त्यातून सुमारे 13 लाख रुपयांचा व्यवसाय केला आहे. यामध्ये त्यांनी काही माल पॅकिंग केला व पुण्याच्या सोसायटीमध्ये विकला, तर काही माल हा मॉलमध्ये (जे मॉल अत्यावश्यक सेवा देत सुरु होते, व तेथे फळ भाज्यांचे मार्केट सुरु होते) अशा ठिकाणी त्यानी त्यांचा माल पॅकिंग करुन विकला.
तसेच लॉकडाऊन या काळात स्वतःच्या शेतातील अंजीरासोबत समीरने आपल्या कंपनी मार्फत गावातील 35 ते 40 शेतकऱ्यांच्या अंजीरांनाही बाजारपेठ उपलब्ध करुन दिली. तसेच विक्री न झालेल्या अंजीरावर प्रक्रिया करुन त्यापासून जॅम बनवण्याचे कामही डोंबे पाटील कंपनीने सुरू केले. या काळात अडीच- तीन टन अंजीरापासून जॅमही बनवला. त्यासाही चांगली मागणी आहे.
समीर डोंबे यांचा इंजिनीअर ते अंजीर किंग असा प्रवास..
पुण्याजवळील दौंड तालुक्यातील खोर या छोट्या गावातील समीर डोंबे या युवकाचा इंजिनीअर ते कृषी क्षेत्रातील उद्योजक असा प्रवास आहे. समीर डोंबे यांनी आपल्या वडिलोपार्जित घेतल्या जाणाऱ्या 'अंजीर' शेतीच्या उत्पादनात आधुनिकतेची कास धरत नाविन्यपूर्ण बदल केले आणि अंजीराचा स्वतःचा 'पवित्रक' हा ब्रॅन्ड निर्माण केला. आता याचं बदलाच्या जोरावर अंजीराच्या बाजारपेठेत समीर यांनी आपले अस्तित्व सिद्ध केले आहे.
खोर हे पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील निसर्ग आणि डोंगराच्या गर्दीत वसलेलं कमी लोकसंख्येच सुंदर गावं, परंतु त्याचवेळी पाण्याची कमतरता! कमी पाण्यावर अंजीराचे उत्पादन घेणे तसे कठीणच. पाण्याचे नियोजन करून शेतकरी गावात सुमारे 250 एकरावर अंजिर घेतात. डोंबे यांचे कुटुंबही अनेक अडचणींचा सामना करुन पारंपारिक पद्धतीने शेतीत अंजीर पिकवायचे आणि स्थानिक बाजारपेठेत पारंपारिक पध्दतीने विकायचे. त्यामुळे जेमतेम उत्पन्न मिळायचे. परंतु मोठे भाऊ डोंबे यांच्या फळ प्रक्रियेतील उच्च शिक्षणाच्या मदतीने समीर डोंबे यांनी आपल्या शेतीतील अंजीरावर प्रक्रिया करून उत्तम विक्री व्यवस्थापनाच्या बळावर एकरी पाच लाख रुपये उत्पन्नापर्यंत मजल मारली. बाजारपेठेचा योग्य अभ्यास करीत त्यानी वडिलोपार्जित 3.5 एकरातील अंजीराची शेती वाढवून एकूण 10 एकरात अंजीराचे उत्पादन सुरू केले
काहीतरी नवीन करण्याचे धाडस आणि सोबतीला मोठ्या भावाचे फूड प्रोसेसिंग मधले ज्ञान वापरून त्यांनी अंजीरावर प्रक्रिया करण्याचे ठरवले. त्यातून शासनाच्या आर्थिक मदतीने 40 दशलक्ष रुपयांची गुंतवणूक करून 'डोंबे पाटील' नावाने अंजीर प्रोसेसिंग युनिट सुरू केले. त्याद्वारे अंजीर जॅम आणि अंजीर जेली हे उत्पादन बनविले. समीर डोंबे यांच्या या प्रयत्नांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.