(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | असंवेदनशीलता... रुग्णालयात कोरोनाचे पेशंट असल्याने विष प्यायलेल्या तरुणाला उपचारासाठी नेण्यास नकार, उशिर झाल्याने तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू
खरं पाहिलं तर तुमच्या नाते संबंध आणि मैत्रीची खरी परीक्षा संकटकाळी होते. मात्र, कोरोनाच्या संक्रमणाची भीती आणि सोशल मीडियावरून त्याबद्दल पसरणारे अनावश्यक व्हिडीओ आणि माहितीमुळे कोरोनाबद्दल भीती निर्माण झाली आहे.
नागपूर : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लोकं कोरोनाचे रुग्ण दाखल असलेल्या रुग्णालयाकडे फिरकायला ही तयार नाहीत. तिथे गेल्यास कोरोनाचे संक्रमण आपल्यालाही होईल या भीतीने नागपुरात विषप्राशन केलेल्या एका तरुणाला वस्तीतील अनेकांनी रुग्णालयात नेण्यास नकार दिला. त्यामुळे विषप्राशन केल्यानंतर अनेक तास घरीच राहिलेल्या त्या तरुणाला उशिरा रुग्णालयात दाखल केले. मात्र दुर्देवाने रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. प्रमोद बुट्टे असं या तरुणाचं नाव आहे. जर कोरोनाच्या भीतीपायी विष प्राशन केलेल्या प्रमोद बुट्टेला मेयो रुग्णालयात नेण्यास वस्तीतील लोकं घाबरले नसते तर प्रमोदचे प्राण वाचले असते अशी खंत आता त्यांच्या पत्नीने व्यक्त केली. त्यामुळे कोरोनाच्या भीतीमुळे माणुसकी आटली की काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.
माहितीनुसार, नागपूरच्या जुनी मंगळवारी परिसरात प्रमोदने विष प्राशन करून आत्महत्या केली खरी मात्र, सध्या कुटुंबाला आणखी एक दुःख सलत आहे. ते म्हणजे कोरोनाच्या भीतीपायी वस्तीतील लोकांनी विष पिऊन तडफडणाऱ्या प्रमोदला रुग्णालयात नेले नाही. 14 मार्च रोजी दुपारी प्रमोदने कोणीच घरी नसताना विषप्राशन केले. काही वेळाने घरी परतलेल्या त्यांच्या पत्नीला तोंडातून फेस येताना पाहून शंका आली. तिने आरडाओरडा करून वस्तीतील शेजाऱ्यांना बोलावले. जवळच्या मेयो या सरकारी रुग्णालयात नेण्याची विनंती केली. मात्र, सध्या मेयो रुग्णालयात कोरोनाचे संक्रमित रुग्ण आणि मोठ्या संख्येने कोरोनाचे संशयित रुग्ण दाखल असल्याने वस्तीतील अनेकांनी मदतीचा हात मागे घेतला.
विषाच्या प्रभावात प्रमोद तडफडतोय आणि शेजारी घाबरल्यामुळे मदत करत नाहीत हे लक्षात आल्यानंतर सोनाली यांनी नागपुरात दुसरीकडे राहणाऱ्या नातेवाईकांना बोलावले. ते येईपर्यंत दोन ते अडीच तास निघून गेले. अखेरीस प्रमोद यांचे नातेवाईक आणि शेजारील काही तरुणांनी 5 वाजताच्या सुमारास प्रमोदला मेयो रुग्णालयात दाखल केले. मात्र, रुग्णालयात काही तासांनी उपचारादरम्यान प्रमोदचा मृत्यू झाला.दरम्यान, नागपूर पोलिसांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले आहे. नागरिकांनी कोरोनाच्या अनाठायी भीतीमुळे नागरिक म्हणून आपले कर्तव्य विसरू नये. अपघातातील जखमी, वृद्ध रुग्ण, गंभीररित्या आजारी रुग्णाना मदत करत त्यांना त्वरित रुग्णालयात न्यावे असे आवाहन नागपूर पोलिसांनी सामान्य नागपूरकरांना केले आहे.