कोरोना व्हायरसचा बीडमधील पोल्ट्री व्यवसायाला फटका, अफवांमुळे ग्राहकांची पाठ फिरवली
चीनमध्ये पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारतातील उद्योग व्यवसायालाही फटका बसतोय. चिकनद्वारे हा व्हायरस परसत असल्याची अफवा आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यातील पोल्ट्री व्यवसायाला मोठा फटका बसतो. गेल्या आठवड्याभरापासून बॉयलर चिकनच्या विक्रीत मोठी घट झाली.
बीड : चीनमध्ये कोरोना व्हायरसमुळे सगळीकडे हाहाकार उडाला आहे. बीडमध्ये या कोरोना व्हायरसच्या भीतीमुळे पोल्ट्री व्यावसायिक मात्र अडचणीत सापडले आहेत. जेव्हापासून या व्हायरसची चर्चा सुरु झाली तेव्हापासून पोल्ट्री व्यवसायाची गंती मंदावली आहे. सोशल मीडियावर कोरोना व्हायसरबाबत अनेक चुकीची पसरवली जात आहे याचा फटका पोल्ट्री फार्म व्यावसायिकांना बसला आहे.
नेकनूरचे शेतकरी सय्यद साजिद यांच्याकडे वडिलोपार्जित सात एकर शेती आहे. या शेतीला जोड व्यवसाय म्हणून त्यांनी पोल्ट्रीचा व्यवसाय सुरु केला. मागच्या चार वर्षापासून साजिद हे या व्यवसायात आहेत, मात्र या व्यवसायात इतकी मंदी त्यांनी यापूर्वी कधीच अनुभवली नव्हती, जी यंदा त्यांना जाणवतेय. या मंदीचं कारण चीनमध्ये हाहाकार उडवून देणारा कोरोना वायरस ठरलंय.
बीड तालुक्यातील कळसंबरमधील बाजीराव वाघमारे यांच्याकडे 7000 पक्षी आहेत. पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये हे पक्षी बाजारात जातील, मात्र सध्या या कोंबड्यांना किलोला केवळ 40 ते 45 रुपये किलो असा भाव मिळतोय. जिथे या कोंबड्यांचा उत्पादन खर्च हा किलोमागे 65 ते 70 रुपये आहे. चिकन खाल्ल्याने कोरोना व्हायरस होतो, अशी अफवा पसरवली त्याचा फटका या पोल्ट्री धारकांना बसत आहे.
कोरोना व्हायरसची चर्चा पसरण्याआधी पोल्ट्री व्यवसायांकडील पक्षाला एका किलोला 90 रुपये भाव मिळत होता. आता मात्र 40 ते 45 रुपये किलो भाव मिळत आहे. विशेष म्हणजे चिकन खाणाऱ्यांच्या संख्येमध्ये तितकीशी घट झाली नसतानाही व्यापारी केवळ या कोरोना व्हायरसच्या अफवेचा फायदा घेत पोल्ट्री व्यवसायिकांना फसवत आहेत.
चिकन विक्री करणारे छोट्या दुकानदारांवर मात्र या अफवेचा परिणाम झालेला जाणवत नाही. आजही मार्केटमध्ये चिकनचा भाव 160 ते 180 रुपये किलो दरम्यानच आहे. 5-10 टक्के मंदी बाजारांमध्ये निश्चित आहे, पण ती फारशी जाणवत नाही. कोरोना हा विषाणूंचा एक मोठा समूह आहे, जो प्राण्यांमध्ये आढळतो. कोरोना विषाणू जनावरांमधून मानवापर्यंत पोहोचतो. महाराष्ट्रात या विषाणूचा कोणताही रुग्ण अद्याप आढळला नाही. विशेष म्हणजे चिकन किंवा मटण खाताना ते पूर्ण शिजवून खावं, असं डॉक्टरांचं मत आहे.
यापूर्वी स्वाईन फ्लू कोंबड्यांपासून पुढे आला होता. म्हणून स्वाभाविकपणे आता कोरोना व्हायरससंदर्भात सुद्धा लोक चिकन खाण्याबद्दल शंका उपस्थित करत आहेत. याच अफवेचा फायदा पोल्ट्री व्यवसायातील दलाल घेत आहेत. कोरोना व्हायरसची व्याप्ती पाहता त्यासंदर्भात शक्य तेवढी काळजी घेणे गरजेचं असलं तरी अफवा पासून दूर राहणे सुद्धा तितकाच महत्त्वाचा आहे.