Exclusive : कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना, दोन्ही लशी सुरक्षित : आरोग्यमंत्री राजेश टोपे
Rajesh Tope Exclusive : लसीकरणाचा पहिला टप्पा तीन ते चार महिने चालेल, अशी माहिती एबीपी माझाच्या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच काम सुरू आहे, असंही ते यावेळी म्हणाले.
जालना : सकाळपासून कोरोना लसीकरण कोणत्याही अडथळ्याविना पार पडलं आहे. लस घेतलेल्या सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहायला मिळालं. लसीकरणाचा पहिला टप्पा तीन ते चार महिने चालेल, अशी माहिती एबीपी माझाच्या मुलाखतीत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले की, लसीकरणासाठी केंद्र शासनाच्या सूचनेनुसारच काम सुरू आहे. केंद्र शासनाच्या सूचना संपूर्ण राज्यासाठी बंधनकारक आहेत आणि त्यांच्या सूचनेचे स्वागत होत आहे. देशामध्ये लसीकरणाचा कार्यक्रम केंद्र शासनाच्या वतीने जात आहेत आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही चुकू नये एवढी काळजी घेतली आहे, असं ते म्हणाले.
टोपे म्हणाले की, आज देण्यात आलेल्या कोवॅक्सिन आणि कोव्हिशील्ड या दोन्ही लशी सुरक्षित आहेत. थोड्या टेक्नॉलॉजी वेगवेगळ्या आहेत. लसीबाबत शासन आणि वैज्ञानिकांवर विश्वास ठेवा. यात सहभाग घेऊन सकरात्मक प्रतिसाद देऊन सुरक्षित राहावे असं आवाहन त्यांनी केलं. ते म्हणाले की, सर्वांच्या चेहऱ्यावर मी आज आनंद पाहिला. नर्स, वार्ड बॉय यांच्या लसीकरणाच्या वेळी मी त्यांच्यासोबत होतो. हे लसीकरण चांगले पार पडण्याचा मला विश्वास आहे, असं ते म्हणाले.
Corona Vaccination: राज्यासह देशभरात लसीकरणाचा उत्साह, कोरोना योद्ध्यांना लस देऊन श्रीगणेशा
ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्याशी बातचीत करताना आम्ही कोविन अॅपबद्दलचे प्रॉब्लेम मांडणार आहोत. साधारण लसीकरचा हा पहिला कालावधी 3 ते 4 महिण्यात संपेल असं ते म्हणाले. मी डॉक्टर नाही, इंजिनियर आहे. पण कुठल्याही क्षेत्रांत गंभीरतेने काम करण्याची मला आवड आहे. आता या पहिल्या टप्प्यात नोंदणी केलेले 8 लाख लाभार्थी आहेत. अजून साडेसात लाख डोस येणे बाकी आहे. गरीब घटक, दारिद्र्य रेषेखालील लोकांना केंद्र शासनाने लसी बाबत मदत करावी अशी अपेक्षा आहे, असं ते म्हणाले.
टोपे म्हणाले की, सध्या प्रत्येक लसीचे काटेकोर नियोजन केले जात आहे. जो प्रधान्यक्रम ठरवला आहे, त्याप्रमाणेच लसीकरण होईल. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे अशी माझी भावना आहे. केंद्र शासनाने ठरवले तर मंत्रीमंडळातील लस घेणारा मी पाहिला व्यक्ती राहील. लसीबाबत आपल्याला विश्वास ठेवावा लागणार आहे. सर्व टेस्टिंगनंतर तपासून ही लस तयार केली आहे. आज लस घेताना कुठंही अप्रिय घटना घडलेली नाही किंवा कोणाला त्रास देखील झालेला पाहायला मिळालेला नाही, असंही टोपे यांनी सांगितलं.