(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परवानगी नसताना शिर्डी साई परिक्रमा काढणाऱ्या आयोजकांवर गुन्हा दाखल
साई परिक्रमा रद्द करण्याबाबत शिर्डी प्रांताधिकारी यांनी आदेश दिले होते. मात्र हे आदेश झुगारुन ग्रीन शिर्डी-क्लीन शिर्डी या सामजिक संघटनेकडून साई परिक्रमा यात्रेचं आयोजन केलं होतं.
शिर्डी : कोरोना व्हायरसच्या वाढतं संकट लक्षात घेत जिल्हा प्रशासनाने स्थगिती आदेश दिल्यानंतरही शिर्डीत साई परिक्रमा आयोजित करण्यात आली होती. याप्रकरणी आयोजकांविरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परवानगी नसताना परिक्रमा काढल्याने पोलिसांनी महोत्सव समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि पदाधिकाऱ्यांवर कलम 188, 177 अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
साई परिक्रमा रद्द करण्याबाबत शिर्डी प्रांताधिकारी यांनी काल सायंकाळी बैठक घेत स्थगितीचे आदेश दिले होते. ग्रीन शिर्डी-क्लीन शिर्डी या सामजिक संघटनेकडून साई परिक्रमा यात्रेचं आयोजन केलं होतं. स्थगिती आदेश स्वीकारत संघटनेकडून साई परिक्रमा स्थगित केल्याचं पत्र देण्यात आलं. मात्र आदेश झुगारत आज मोठ्या संख्येने सहभाग घेत भाविकांनी परिक्रमा पूर्ण केली. कोरोना व्हायरसपासून मुक्ती मिळावी, अशी प्रार्थना या माध्यमातून केल्याचं स्थानिक भाविकांनी सांगितलं.
या साई परिक्रमेत शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा अर्चना कोते, महंत रामगिरी महाराज, काशिकानंदजी महाराज, माजी विश्वस्त सचिन तांबे तसेच सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. विशेष म्हणजे एकीकडे उद्धव ठाकरे गर्दी करू नका आवाहन करत असताना शिवसेनेचे खासदार सदाशिव लोखंडे हे देखील काही वेळ या परिक्रेमेत सहभागी झाले होते. दरम्यान आता या प्रकरणी आयोजकांविरोधात शिर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या 33 वर
- पुणे - 16
- मुंबई - 5
- ठाणे - 1
- कल्याण- 1
- नवी मुंबई - 1
- पनवेल - 1
- नागपूर - 4
- अहमदनगर - 1
- यवतमाळ -2
- औरंगाबाद - 1
देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 107 वर
- महाराष्ट्र -33
- केरळ - 22
- पंजाब - 1
- दिल्ली - 7
- जम्मू कश्मीर - 2
- लडाख - 3
- राजस्थान - 4
- उत्तरप्रदेश - 11
- कर्नाटक - 6
- तामिळनाडू - 1
- तेलंगाना - 3
- हरयाणा - 14
- आंध्रप्रदेश - 1
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्ममंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा
कोरोनाच्या राज्यातील सद्यस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात आज फोनवरुन चर्चा झाली. एएनआयच्या वृत्तानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुळे काय परिस्थिती निर्माण झाली आहे याचा आढावा घेतला. तसेच सुरक्षेचे काय उपाय योजता येतील याविषयीही चर्चा केली.
संबंधित बातम्या :