काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पक्षातीलच महिला झेडपी सदस्याचं आव्हान; बालेकिल्ल्यातच झळकावले भावी आमदाराचे बॅनर
Congress : नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या डॉ मनीषा निंबार्ते यांनी थेट काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना आव्हान दिल्याची चर्चा आहे.
Maharashtra Politics भंडारा : राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर आता नव्याने येणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे (Vidhan Sabha Election 2024) साऱ्यांना वेध लागले आहे. त्या अनुषंगाने स्थानिक पातळीपासून ते देश पातळीवर राजकीय घडामोडींना आता वेग आले आहे. सध्या जरी निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या नसल्या तरी त्यासाठीची आचारसंहिता कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता प्रत्येक पक्ष सर्वच मतदारसंघात मोर्चे बांधणीसाठी सज्ज झाला आहे. अशातच आता अनेक ठिकाणी राजकीय नेत्यांचे बॅनर चर्चेचा विषय ठरत आहे. असाच काहीसा प्रकार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या गृह मतदारसंघाटतून समोर आला आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना पक्षातील महिला झेडपी सदस्याचं आव्हान?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना भावी मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी आणि आता नेत्यांनीही डोक्यावर घेतलं आहे. नाना पटोले यांच्या साकोली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या जिल्हा परिषद सदस्या डॉ मनीषा निंबार्ते यांच्या समर्थकांनी भावी आमदार या आशयाचे बॅनर सर्वत्र लावले आहेत. डॉ मनीषा निंबार्ते यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणाऱ्या या बॅनरवर त्यांचा "भावी आमदार" असा उल्लेख केला आहे.
डॉ मनीषा निंबार्ते यांचे पती डॉ चंद्रकांत निंबार्ते यांना लोकसभेचं तिकीट मिळेल या अपेक्षेनं त्यांनी तयारी केली होती. मात्र, डॉ. प्रशांत पडोळे यांना काँग्रेसनं लोकसभेची उमेदवारी दिली. तेव्हापासून डॉ. मनीषा निंबार्ते या काँग्रेस नेत्यांवर नाराज आहेत, हे विशेष. त्यात आता त्यांच्या वाढदिवसानिमित्त लावण्यात आलेल्या बॅनरवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाचं काँग्रेस जिल्हा परिषद सदस्या निंबार्ते यांनी या माध्यमातून आव्हान तर दिलं नाही ना,अशी चर्चा आता भंडाऱ्यात रंगली आहे.
भंडाऱ्याच्या शिवसेना ठाकरेच्या दोन गटात अंतर्गत कलह
विधानसभा निवडणुका लागण्याच्या पूर्वीचं भंडाऱ्याच्या शिवसेना ठाकरे गटात दोन गट पडल्याचं चित्र बघायला मिळत आहे. मागील आठवड्यात शिवसेनेच्या भंडारा जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील दोन गटात वाद निर्माण झाला होता. यावरून आता एका गटाच्या पदाधिऱ्यांची पदं गोठविण्यात आल्याचं शिवसेना मुंबई मध्यवर्ती कार्यालयातून 'सामना'त प्रसिद्ध केलं आहे.
पदावरून उचलबांगडी करण्यात आलेल्यांमध्ये भंडारा जिल्हा सहसंपर्कप्रमुख नरेश डहारे, भंडारा उपजिल्हाप्रमुख दीपक गजभिये, भंडारा विधानसभा संघटक चंदू उके, पवनी शहर प्रमुख शंकर भुरे, पवनी शहर संघटक आकाश दुर्गे या पाच जणांची पदे पक्षाने काढून घेतली आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीच शिवसेनेच्या ठाकरे गटात भंडाऱ्यात उघड उघड दोन गट पडल्याचं चित्र निर्माण झाल्यानं आगामी निवडणुकीत याचा परिणाम पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
हे ही वाचा