(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Devendra Fadnavis : फडणवीसांनी विदर्भात जे विकास कामांचे दिवे लावले त्यावर चर्चेची गरज; पृथ्वीराज चव्हाण यांचा टोला
Prithviraj Chavan On Devendra Fadnavis : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकास कामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता असल्याचेही चव्हाण म्हटले.
सातारा : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी कंत्राटी भरतीच्या निर्णयाचे खापर मागील मविआ सरकारवर (MVA Govt) फोडल्यानंतर आता राज्यातले राजकारण आणखी तापू लागले आहे. कंत्राटी भरती मधील अग्नीवीर योजना (Agniveer) ही मातृयोजना आहे. त्यालाच या सरकारमधले शिंदे फडणवीस पवार सरकार समर्थन करत असल्याचे काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी म्हटले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकास कामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता असल्याचेही चव्हाण म्हटले.
सातारामधील पत्रकार परिषदेत पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले की, फडणवीस शिंदे आणि पवार सरकारने काढलेला 23 सप्टेंबरचा महत्त्वांच्या कार्यकारी पदांच्या कंत्राटी भरतीचा निर्णय मागे घेतला आहे. त्यांनी चुक सुधारली ही चांगली गोष्ट आहे. कंत्राटी भरती मधील अग्नीवीर योजना ही मातृयोजना आहे. त्यालाच या सरकारमधले शिंदे फडणविस पवार सरकार समर्थन करत आहे. ती योजना रद्द करा. नाहीतर जनतेचा रेटा तुम्हाला माहिती आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला निर्णय रेट्यामुळे त्यांना रद्द करावा लागला. आता, तसाच रेटा आल्यामुळे हा कंत्राटी भरतीचा रेटा रद्द करावा लागला असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. विदर्भात आज अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भात ज्या विकास कामांचे दिवे लावले आहेत, त्यावर चर्चेची अधिक आवश्यकता असल्याचेही चव्हाण म्हटले.
नागपूर कराराप्रमाणे आपण हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये घेतो. यानिमित्ताने विदर्भातील प्रश्नांना न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाचा कालावधी कमी केला आहे. सत्ताधारी असताना आणि विरोधी पक्षात असताना वेगळी भूमिका घ्यायची हा या सरकारचा दांभिकपणा आहे, असे टीकास्त्र ही त्यांनी सोडले. मविआ सरकारच्या काळात हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये न झाल्याने फडणवीस यांनी तत्कालील सरकारवर टीका केली होती. आता आपलीच जुनी टीका त्यांनी आठवावी असेही चव्हाण यांनी म्हटले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लांबलेल्या निवडणुकांबाबतही पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारवर टीका केली. तुम्हाला लोकांपर्यंत जाण्याची भीती वाटते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तुम्हाला घेत येत नाही, लोकांमध्ये रोष आहे आणि या रोषाला तुम्हाला सामोरे जावे लागणार असल्याचे चव्हाण यांनी म्हटले.
ललित पाटील या आरोपीने उच्चपदस्थ लोकांशी संबंध असल्याचे म्हटले. सरकार, प्रशासनात कोणती मंडळी यात गुंतले आहेत, याची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.