एक्स्प्लोर
दिग्गजांना बाजूला काँग्रेसच्या दोन उमेदवारांची नावे जाहीर; निवडणूक बिनविरोध होणार?
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 11 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर यासाठी 21 तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे.
मुंबई : विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसने मराठवाड्यातील दोन नवख्या उमेदवारांची नावे शनिवारी रात्री जाहीर करून, उमेदवारांच्या शर्यतीत असलेल्या बड्या नेत्यांची नावे कापली आहेत. काँग्रेसकडून राजकिशोर उर्फ पापा मोदी आणि राजेश राठोड यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी याबाबतची घोषणा केली. काँग्रेसकडून अनेक दिग्गजांची नावं चर्चेत होती, मात्र पक्षानं या दोन नेत्यांना संधी दिली आहे.
काँग्रेसने आधी फक्त राठोड यांचंच नाव जाहीर केलं, केव्हा सर्वांना वाटलं निवडणूक बिनविरोध होणार पण प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शनिवारी साडेआठच्या सुमारास पापा मोदी यांचं नाव जाहीर करुन निवडणुकीत चुरस आणली.
कोण आहेत पापा मोदी?
राजकिशोर उर्फ पापा मोदी हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील असून, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आहेत. तसेच पापा मोदी यांचे सहकार क्षेत्रात मोठे योगदान आहे.
कोण आहेत राजेश राठोड?
राजेश राठोड हे जालना जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहेत. एनएसयूआयपासूनच ते काँग्रेसमध्ये सक्रिय होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे सचिव म्हणूनही ते संघटनेत काम करत आहेत.
दरम्यान विधानपरिषदेच्या एकूण नऊ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. त्यात भाजपनं चार नावांची घोषणा आधीच केलेली आहे. आघाडीनं पाचचं उमेदवार दिले तर निवडणूक बिनविरोध होईल, सहा उमेदवार दिल्यास मात्र मतदानाची वेळ येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अद्याप आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केलेली नाही.
भाजपला चौथा उमेदवार निवडून आणण्यासाठी तर आघाडीला सहावा उमेदवार निवडून आणण्यासाठी काही मतांची कमतरता आहे. पण सरकार असल्यानं ही मतं आपल्या बाजूला खेचणं शक्य आहे असा दावा काँग्रेसच्या बाजूनं केला जातोय. त्यामुळे ही अधिकची जागा काँग्रेसला मिळणार का हे पाहणं औत्सुक्याचं असेल. विधानपरिषदेसाठी काँग्रेसमध्ये नसीम खान, रजनी पाटील, माणिकराव ठाकरे, हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह अनेकांच्या नावाची चर्चा होती. मात्र काँग्रेस हायकमांडनं अखेर राजेश राठोड यांच्या नावाला पसंती दिली आहे. विधानसभेवेळी काँग्रेसनं बंजारा समाजातल्या व्यक्तीला तिकीट दिलं नव्हतं, त्यामुळे यावेळी या समाजाला न्याय देण्याचा हा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया एका काँग्रेस नेत्यानं माझाशी बोलताना व्यक्त केली आहे.
आतापर्यंत जाहीर झालेल्या उमेदवारांची नावं
उद्धव ठाकरे-शिवसेना
नीलम गोऱ्हे-शिवसेना
राजेश राठोड-काँग्रेस
राजकिशोर मोदी-काँग्रेस
रणजितसिंह मोहिते पाटील-भाजपा
गोपीचंद पडळकर-भाजपा
प्रवीण दटके- भाजपा
डॉ. अजित गोपचडे-भाजपा
निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर
विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 11 मे पर्यंत अर्ज भरण्याची मुदत आहे. तर यासाठी 21 तारखेला मतदान होणार असून त्याच दिवशी मतमोजणी होणार आहे. 26 मेपर्यंत प्रक्रिया पूर्ण करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहेत.
विधानपरिषदेची सत्तासमिकरणं
विधानसभेत 288 आमदार आहेत. विधानपरिषदेत आमदार म्हणून निवडून जायला 29 मतांचा कोटा आहे. आकडेवारी पाहता महाविकास आघाडीच्या पाच तर भाजपच्या तीन जागा जवळपास निश्चित आहेत. नवव्या जागेसाठी मात्र चुरस पाहायला मिळणार आहे. महाविकास आघाडीकडे 170 मतं आहेत. सहा जागांसाठी त्यांना 174 मतांची आवश्यकता आहे. तर भाजपकडे 105 स्वत:ची तर 6 ते 7 मित्रपक्षांची मतं असल्याचा दावा केला जातोय. त्यामुळं महाविकास आघाडीला 5 आणि भाजपला 3 जागा निश्चित असल्या तरी नववी जागा कुणाला मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दरम्यान भाजपने चार आणि महाविकास आघाडीने चार जागांची घोषणा केली आहे.
विधानसभेच्या बहुमत चाचणीवेळी महाविकास आघाडी अर्थात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 169 मतं मिळाली होती. 169 विरुद्ध 0 असं बहुमत सिद्ध झालं होतं. मात्र विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीनं होणार आहे. तसेच स्वत: मुख्यमंत्री मैदानात असल्यानं हा सामना रंगतदार असणार आहे.
दुसरीकडे कोरोनासारख्या काळात ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता असल्याची चर्चा देखील आहे. महाविकासआघाडीने सहावा उमेदवार रिंगणात उतरवला तर निवडणूक नक्कीच रंगतदार होईल. पण मुख्यमंत्री स्वतः निवडणुकीच्या रिंगणात असताना हा धोका आघाडी पत्करण्याची शक्यता नाही व निवडणूक बिनविरोध होईल अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
पुणे
विश्व
छत्रपती संभाजी नगर
Advertisement