(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ग्रामपंचायत उमेदवारी अर्ज बाद झाल्याने तृतीय पंथीयांचा तहसीलदार कार्यलयात गोंधळ
तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद केला. यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथींनी संताप व्यक्त करत तहसीलदार कार्यालयात गोंधळ घातला.
जळगाव : जळगाव जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज छाननी प्रक्रिया झाली या प्रक्रियेत जळगाव तहसील कार्यालयात एका तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावरून चांगलेच वातावरण तापल्याचे पाहायला मिळाले. तृतीयपंथीच्या उमेदवारी अर्जावर हरकत घेऊन निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी तो अर्ज बाद केला. यामुळे संतप्त झालेल्या तृतीयपंथींनी संताप व्यक्त करत तहसीलदार कार्यालयात गोंधळ घातला.
जळगाव तालुक्यातील भादली येथील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अंजली पाटील नामक तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गाची जागा असलेल्या एका वॉर्डातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. या अर्जासोबत त्यांनी आवश्यक ती सर्व तृतीय पंथी असल्याची कागदपत्रे जोडली होती. आज उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या अर्जावर हरकत घेतली. तृतीयपंथी असल्याने त्यांना सर्वसाधारण महिला प्रवर्गातून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार नाही, असा खुलासा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिला. या कारणावरून अंजली पाटील यांनी संताप व्यक्त केला. आपला अर्ज चुकीची हरकत घेऊन बाद केला आहे. हा आपल्यावर अन्याय असल्याचा दावा त्यांनी केला
अंजली पाटील यांचा उमेदवारी अर्ज बाद केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे सहकारी तथा वंचित बहुजन युवा आघाडीच्या राज्य कार्यकारिणी सदस्या शमिभा पाटील यांनी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातला. एका तृतीयपंथीने सर्वसाधारण महिला प्रवर्गातून निवडणूक लढवू नये, याबाबत राज्य निवडणूक आयोगाचा काही निर्णय आहे का? असेल तर तसे लेखी द्यावे, अशी मागणी शमिभा पाटील यांनी केली. जोवर अंजली पाटील यांच्या निवडणूक अर्जाविषयी योग्य तो निर्णय होत नाही, तोपर्यंत आपण तहसील कार्यालयातून हलणार नाही, असा पवित्रा त्यांनी घेतला. त्यामुळे अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.
यावेळी पत्रकारांकडे आपली बाजू मांडताना तृतीयपंथी अंजली पाटील यांनी सांगितले की, मी एक तृतीयपंथी आहे. सर्टिफाईड ट्रान्सजेंडर असल्याबाबत माझ्याकडे प्राधिकृत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेले वैद्यकीय प्रमाणपत्र आहे. एवढेच नव्हे तर भारत सरकारने दिलेले आधार कार्ड, मतदान कार्डही आहे. त्यावर देखील माझा तृतीयपंथी म्हणून उल्लेख आहे, असे असताना मला निवडणूक लढवण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. पण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने माझा उमेदवारी अर्ज बाद केल्याचा आरोप अंजली पाटील यांनी केला. माझा अर्ज जर सर्वसाधारण महिला प्रवर्गातून दाखल करता येत नव्हता तर मला अर्ज दाखल करतेवेळी किंवा अर्ज बाद करण्यापूर्वी विहित वेळेत कळवायला हवे होते. आता मला न्याय हवा आहे, असेही त्यांनी सांगितले.