CM Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या पंतप्रधानांच्या घोषणेचे मुख्यमंत्र्यांनी केले स्वागत
CM Uddhav Thackeray : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी देशाला संबोधित करताना लसीकरण आणि बूस्टर डोस (Booster Dose) संबंधी महत्त्वाची घोषणा केली. यावेळी त्यांनी 18 वर्षांखालील नागरिकांच्या लसीकरणासह (Vaccination) बूस्टर डोस संबंधीदेखील माहिती दिली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर्स तसेच फ्रंट लाइन वर्कर्स यांना बूस्टर डोस देण्याच्या केलेल्या घोषणेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी स्वागत केले आहे.
बूस्टर डोस देण्यासंदर्भात नुकतीच राज्य मंत्रिमंडळातदेखील चर्चा झाली होती आणि आमची ती मागणी होतीच, असे मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनीदेखील 7 डिसेंबर रोजी पत्र लिहून मुलांना लसीकरण करण्याची तसेच बूस्टर डोस देण्याची विनंती केंद्रीय आरोग्य मंत्र्यांना केली होती. याशिवाय पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांनादेखील लसीकरण केल्याने विषाणूचा पुढील संसर्ग रोखण्यासाठी निश्चितपणे मदत होईल तसेच सहव्याधी असलेल्या ज्येष्ठ नागरिकांनादेखील बूस्टर डोसमुळे फायदा मिळेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील पंतप्रधानांच्या घोषणेचे स्वागत केले आहे. लसीकरणाबाबत आपण प्रगती करत आहोत. पंतप्रधानांनी तीन महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरू करणार. दुसरी घोषणा म्हणजे आरोग्य कर्मचारी (Health Workers) अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना (Frontline Workers) दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदींनी सांगितलं. तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं.
लहान मुलांचे लसीकरण आणि बूस्टर डोसच्या घोषणेचे आरोग्यमंत्र्यांकडून स्वागत
पंधरा ते अठरा वर्षांच्या वयोगटातील मुलांचे लसीकरण तसेच बूस्टर डोससाठी पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेचे राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्वागत केले आहे. 19 नोव्हेंबरपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वतीने आपण केंद्रीय आरोग्य मंत्री यांची प्रत्यक्ष भेट घेऊन ही मागणी केली होती. आज पंतप्रधानांनी केलेल्या या घोषणेची खरी गरज होती. दरम्यान, लसीकरणाचे राज्यात योग्य पद्धतीने नियोजन करण्यात येईल. याशिवाय सर्व परिस्थितीला तोंड देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज असल्याचंदेखील टोपे म्हणाले.
मोदींनी केलेल्या नेमक्या तीन घोषणा काय आहेत?
पंतप्रधान मोदी यांनी देशाला संबोधित करताना तीन मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सर्वात पहिली घोषणा म्हणजे 15 ते 18 वयोगटातील (15 to 18 Age Vaccination) मुलांचं लसीकरण सुरू करणार असल्याची मोठी घोषणा केली. हे लसीकरण नव्या वर्षात 3 जानेवारीपासून सुरू होणार आहे. यामुळे शाळांमध्ये अखेरच्या वर्षात तसंच कनिष्ट महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं मोदींनी सांगितलं.
त्यानंतर दुसरी महत्त्वाची घोषणा बूस्टर डोसबाबत मोदींनी केली. आरोग्य कर्मचारी (Health Workers) अर्थात हेल्थ केअर वर्कर्स आणि फ्रंटलाईन वर्कर्सना (Frontline Workers) दोन लसीकरणांनंतर बूस्टर डोसही देण्याची सुरुवात करण्यात येणार असल्याचं मोदींनी सांगितलं. याची सुरुवात 10 जानेवारी, 2022 पासून होणार आहे.
त्यानंतर तिसरी घोषणा म्हणजे 60 वर्षांवरील सामान्य नागरिकांनाही डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस देण्याची सुरुवात करणार असल्याचं यावेळी मोदींनी सांगितलं.
संबंधित बातम्या