मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री रुग्णालयात, उद्या शस्त्रक्रिया? हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता
यंदा देखील हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) HN रिलायंन्स हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल झाले आहेत. मानेच्या दुखण्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे रुग्णालयात दाखल झाले असून उद्या त्यांच्यावर शस्त्रक्रिया होणार असल्याची देखील माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वरिष्ठ आर्थो सर्जन डॉक्टरांच्या सल्ल्याने विविध वैद्यकीय चाचण्या करण्यात येणार आहेत. या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर वरिष्ठ डॉक्टर मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी चर्चा करतील त्यानंतरच मानेच्या दुखण्यावर शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय घेतला जाणार आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काल रुग्णालयात दाखल झाले. पुढील दोन ते तीन दिवस मुख्यमंत्री ठाकरे मानेच्या दुखण्यावर उपचार घेणार आहेत. याबाबतची माहिती खुद्द मुख्यमंत्र्यांनीच दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, गेल्या सुमारे दोन वर्षांपासून आपण कोविडचा मुकाबला करतो आहोत. एकीकडे या विषाणूशी लढाई सुरू असतांना दुसरीकडं आपलं जीवनचक्र सुरू राहावं, राज्यातली विकास कामं सुरूच राहावीत म्हणून आम्ही सगळे कुठेही न थांबता सातत्यानं प्रयत्न करतोय. मान देखील वर करायला वेळ मिळत नव्हता, साहजिकच माझ्या मानेच्या दुखण्याकडे नाही म्हणलं तरी थोडंसं दुर्लक्ष झालं आणि मानेवर जो परिणाम व्हायचा तो झालाच! पण या दुखण्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत यादृष्टीनं डॉक्टरांनी सल्ला दिल्यावरून मी आज रुग्णालयात दाखल होणार असून दोन तीन दिवस तिथेच राहून योग्य ते उपचार घेणार आहे. आपले आशीर्वाद माझ्या पाठीशी आहेत. आरोग्याविषयी माहिती देताना मुख्यमंत्र्यांना नागरिकांना लस घेण्याचे आवाहन केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना लसींच्या बाबतीत आपण 10 कोटींचा टप्पा ओलांडला असला तरी आपल्याला सर्वांना लसींचे दोन डोस घेणे अतिशय महत्वाचे आहे. आपल्या जीवनाला सुरक्षित ठेवण्यासाठी लगेचच जवळच्या केंद्रावर जाऊन लस घ्या, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.
हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता
दरम्यान यंदा देखील हिवाळी अधिवेशन मुंबईतच होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी देखील नागपूर येथे होणारे हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याचा निर्णय घेण्यात आला होता. यंदा देखील देशात आणि राज्यात अजूनही कोरोनाचे संकट पूर्णपणे संपलेले नाही. सोबतच मुख्यमंत्र्यांची प्रकृती ठीक नसल्यामुळं नागपूरऐवजी हिवाळी अधिवेशन मुंबईतच घेतलं जाईल असं बोललं जात आहे. महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन नागपूरात 7 डिसेंबरपासून प्रस्तावित आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर या अधिवेशनासाठी विशेष प्रतिबंधात्मक तयारी देखील करण्यात आली आहे. मात्र आता अधिवेशन नागपुरात होतं की मुंबईत याकडे लक्ष लागून आहे.