उद्धव ठाकरे यांनी असंगाशी संग केला अन् तीन महिन्यांपूर्वी इतिहास घडला; मुख्यमंत्री शिंदेंनी सांगितली सत्तांतराची गोष्ट
CM Eknath Shinde : मी एखाद्याला विश्वास दिला तर तो मी पूर्ण करतोच असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
मुंबई : उद्धव ठाकरे यांना मी पाच वेळा विनंत्या केल्या होत्या, असंगाशी संग करु नका, पण त्यांनी अनैसर्गिक युती केली आणि मग तीन महिन्यांपूर्वी इतिहास घडला असं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं. लोकमत समूहाच्या एका कार्यक्रमात ते अभिनेते नाना पाटेकर यांच्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित होते.
लोकमत समूहाच्या कार्यक्रमात अभिनेते नाना पाटेकर यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. या दोन नेत्यांना त्यांना विविध प्रश्नावर बोलतं केलं.
तीन महिन्यांपूर्वी हा इतिहास घडला
राज्यातील झालेल्या सत्तांतरावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "पाणी ज्यावेळी डोक्यावरुन जातं त्यावेळी आपली भूमिका आहे, विचार आहे ते टिकवणं आवश्यक असतं. जेव्हा असंगाशी संग होतो, अनैसर्गिक गोष्टी घडतात त्यावेळी अशी भूमिका घ्यावी लागते. ही भूमिका घेताना पुढे काय होईल याची माहिती नव्हती. आघाडीतील पराभूत झालेले नेते ज्यावेळी आमच्या आमदारांच्या मतदारसंघातील नारळ फोडू लागले त्यावेळी आम्ही ही भूमिका घेतली. जेव्हा सर्वांनाच असह्य झालं त्यावेळी आम्हाला हे पाऊल उचलावं लागलं. अनैसर्गिक युती आम्हाला पटली नाही. त्यासंबंधी उद्धव ठाकरे यांना पाच वेळा विनंत्या केल्या होत्या. पण त्यावर काहीही करण्यात आलं."
एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी 'एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो...' हा सलमान खानचा डॉयलॉग मारला. ते म्हणाले की, "आम्ही आनंद दिघे यांचे कार्यकर्ते आहोत. मग लढता लढता काही झालं तरी त्याचा विचार केला नाही. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात होतो. मी एकदा कुणाला विश्वास दिला तर तो पूर्ण करतोच. एक बार मैंने जो कमिटमेंट कर दी तो में अपने आपकी भी नही सुनता. "
धनुष्यबाण हे आमचंच
धनुष्यबाण हे चिन्ह आमच्याच गटाचं असेल असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांची शिवसेना या आमच्या गटाकडे 55 आमदार आणि 12 खासदार आहेत. शिवसेनेतील 70 टक्क्याहून अधिक बहुमत आमचे आहे. धनुष्यबाण हे चिन्ह गोठवण्यामागे विरोधी पक्षाचा हात आहे. त्यांनी बोगस अफिडेव्हिट आणले. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. त्यामुळे बाळासाहेबांच्या शिवसेनेकडेच यापुढे धनुष्यबाण असेल. सर्व काही लोकशाहीच्या मार्गाने होणार असून यामध्ये आमचाच विजय होणार आहे.
मुंबई दोन वर्षात खड्डेमुक्त करणार
मुंबई हे आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्यामुळे मुंबईतील 450 किमीची रस्ते काँक्रिटचे करावेत असे आदेश दिले आहेत. येत्या दोन वर्षामध्ये मुंबईतील सर्व रस्ते कॉंक्रिटचे असतील, त्यावर एकही खड्डे दिसणार नाहीत असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्यासाठी प्रयत्नशील
गेल्या नऊ महिन्यामध्ये 1092 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, यावर काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी काय केलं पाहिजे असं नाना पाटेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाल की, "शेतकऱ्यांना आत्महत्या कराव्या लागू नयेत म्हणून आम्ही जवळपास 11 हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे. जे पाणी समुद्राकडे वाहून जात आहे, त्याचा वापर कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. मराठवाडा विदर्भातील आत्महत्या कमी कशी होईल यावर काम सुरू आहे."
नाना पाटेकरांनी व्यक्त केलेल्या चिंतेवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "ज्या ठिकाणी सिंचन आहे त्या ठिकाणी आत्महत्या होत नाहीत, तर ज्या ठिकाणी सिंचन नाही त्या ठिकाणी आत्महत्या होत असल्याचं समोर आलं आहे. त्यासाठी आम्ही जलयुक्त शिवार योजना सुरू केली. त्या माध्यमातून 39 लाख हेक्टर जमीन ही रबीच्या पिकाखाली आली. त्यामुळे 27 टीएमसी पाणी थांबलं. या ठिकाणाहून वाहून जाणारं पाणी हे गोदावरीपर्यंत आणलं, किंवा विदर्भातील वाहून जाणारं पाणी हे बुलढाण्यापर्यंत आणलं तर जवळजवळ सर्व दुष्काळी पट्टा आहे तो ओलिताखाली येईल. आता आपण 100 टक्के फिडर हे सोलरखाली आणणार असून येत्या दोन तीन वर्षात ही योजना पूर्ण केली जाणार आहे."