देशद्रोह्यांच्या विरोधात बोलायचं असल्यास मी 50 वेळा हा गुन्हा करेन, मी माझ्या शब्दावर ठाम; हक्कभंग प्रस्तावावरुन मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया
Eknath Shinde : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मी केलेलं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार, रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नव्हतं, तर मी नवाब मलिक यांच्याविरोधातील होतं अशी प्रतिक्रिया दिली.
CM Eknath Shinde : अर्थसंकल्पीय अधिवेशनाल प्रारंभ होण्यापूर्वी विरोधकांनी चहापानावर बहिष्कार टाकल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी (Eknath Shinde on breach of privilege motion) देशद्रोह्यांसोबत चहापान टळले तरे बरं झालं अशी प्रतिक्रिया दिली होती. खासदार संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग आणण्याची तयारी केल्यानंतर विरोधक सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या याच वक्तव्यावरुन आक्रमक झाले आहेत. आज विधानपरिषदेमध्ये त्याचे पडसाद उमटले. विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात हक्कभंग दाखल करण्यात आला.
हक्कभंग दाखल करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानपरिषदेत खुलासा केला. यावेळी त्यांनी आपण आपल्या शब्दावर ठाम असल्याचे सांगितले. मी केलेलं वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार, रावसाहेब दानवे यांच्या विरोधात नव्हतं, तर मी नवाब मलिक यांच्याविरोधातील होतं अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी केलेल्या खुलाशानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही. दुसरीकडे, संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपल्या वक्तव्याचा सात दिवसात खुलासा करावा, अशी सूचना उसभापती निलम गोऱ्हे यांनी केली आहे.
ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी मुख्यमंत्र्यांनी इथे खुलासा करण्यापेक्षा हक्कभंग समितीसमोर खुलासा करावा, अशी मागणी केली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही हस्तक्षेप करत मुख्यमंत्र्यांचा शब्द प्रमाण मानावा, अशी भूमिका मांडली. तसेच अजित पवारांनी महाराष्ट्रद्रोही म्हटलेल्या शब्दाची आठवण करुन दिली.
हक्कभंगावर एकनाथ शिंदे काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांनी आपल्या वक्तव्यावरुन खुलासा केला. ते म्हणाले की, "जो हक्कभंग विरोधी पक्षाकडून देण्यात आला आहे, त्या संदर्भात माझं वक्तव्य नाही. माझं वक्तव्य अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्याविरोधातील नव्हतं, तर माझं वक्तव्य हे नवाब मलिक यांच्याविरोधातील होतं. देशद्रोही दाऊद इब्राहिम आणि इब्राहिम हसीना पारकर यांच्याबाबत होतं. गोवावाला कंपाऊंडमध्ये 150 भाडेकरु होते. 1995 मध्ये अवैधरित्या कब्जा करुन नवाब मलिक यांनी घेतले. 55 लाख रुपये किंमतीत हसीना पारकरकडून जमिनी घेतली. त्यांची 15 कोटी 50 लाखांची प्रॉपर्टी सेझ करण्यात आली आहे. यामध्ये जी कलम लावण्यात आली आहेत ती दहशतदाला खतपाणी घालण्याचं काम करणारी आहेत, त्यामुळे मी त्यांना देशद्रोही बोललो.
देशद्रोही नवाब मलिक जेलमध्ये जाऊनही त्यांचा राजीनामा घेतला गेला नाही, अशा मागच्या सरकारमधील मंत्रिमंडळासोबत आम्ही चहा घेणार नाही म्हणालो. मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्र्यांना म्हणालो होतो तुम्ही संजय राठोडांचा राजीनामा घेतला, मग नवाब मलिक यांचा का घेतला नाही? मी माझ्या शब्दावर ठाम आहे. अजित पवार आम्हाला म्हणाले आम्ही महाराष्ट्रद्रोही आहोत. दाऊदशी बरोबर आर्थिक मदत करणाऱ्याला मी देशद्रोही बोललो, माझं चुकलं काय? देशद्रोहाच्या विरोधात बोलायचं असेल तर मी 50 वेळा गुन्हा करेन.
शशिकांत शिंदेंकडून आक्षेप
दुसरीकडे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आक्षेप घेतला. ते म्हणाले की, "नवाब मलिक यांच्यावरील आरोप सिद्ध झालेले नाहीत, तर मग हे कसे काय बोलत आहेत? आम्ही देशद्रोह्यांचे समर्थन करत नाही."
इतर महत्वाच्या बातम्या