'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देणाऱ्या दोघांना नागरिकांनी बांधून चोपलं
रामदुर्ग येथे शुक्रवारी एका काँग्रेस नेत्याने पाकिस्तान झिंदाबाद म्हणून फेसबुकवर पोस्ट टाकून जनतेचा रोष ओढवून घेतला होता. त्यानंतर आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं स्पष्टीकरण या काँग्रेस नेत्यानं दिलं होतं.
बेळगाव : पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा देऊन फटाके फोडणाऱ्या दोन तरुणांना संतप्त नागरिकांनी बांधून बेदम चोप दिला आहे. बेळगावच्या कामत गल्लीत हा सगळा प्रकार घडला आहे. पोलिसांनी या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे.
रविवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास संवेदनशील समजल्या जाणाऱ्या कामत गल्लीत चार तरुण दाखल झाले. गल्लीत आल्यावर या चौघा तरुणांनी 'पाकिस्तान झिंदाबाद'च्या घोषणा देत फटाके फोडले. घोषणाबाजी आणि फटाक्यांचा आवाज ऐकून नागरिक घराबाहेर आले. त्यावेळी त्यांना चार तरुण पाकिस्तान झिंदाबाद घोषणा देत फटाके फोडत असल्याचे दिसून आले.
मात्र गर्दी झाल्याचे पाहताच या चौघांनी पळून जाण्याच प्रयत्न केला. त्यावेळी गल्लीतील संतप्त तरुणांनी या चौघांचा पाठलाग केला. यावेळी दोन तरुण पळून जाण्यात यशस्वी झाले, मात्र दोन तरुणांना नागरिकांच्या तावडीत सापडले.
नागरिकांनी त्या दोघांची बांधून चांगलीच धुलाई केली. पोलिसांना हे वृत्त कळताच पोलीस कामत गल्लीत दाखल झाले आणि त्यांनी या तरुणांना ताब्यात घेतले. मार्केट पोलिसात सदर घटनेची नोंद झाली आहे. पुलवामा घटनेनंतर पाकिस्तानविरोधात संतापाचं वातावरण आहे.
रामदुर्ग येथे शुक्रवारी एका काँग्रेस नेत्याने पाकिस्तान झिंदाबाद म्हणून फेसबुकवर पोस्ट टाकून जनतेचा रोष ओढवून घेतला होता. त्यानंतर आपले फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याचं स्पष्टीकरण या काँग्रेस नेत्यानं दिलं होतं.