गरिबांना निकृष्ट दर्जाचा मका दिल्याने नागरिक संतप्त; घाटंजी तहसील कार्यालयात फेकला मका
गरिबांना निकृष्ट दर्जाचा मका दिल्याने संतप्त नागरिकांनी घाटंजी तहसील कार्यालय परिसरात मका फेकून आपला राग व्यक्त केला.
यवतमाळ : शासनाच्या स्वस्त धान्य योजनेचा लाभ गेल्या कित्येक वर्षांपासून सुरळीत सुरू होता. मात्र, शासन आणि प्रशासनाच्या संगनमताने स्वस्त धान्य दुकानाच्या माध्यमाने गव्हाच्या जागेवर निकृष्ट दर्जाचा मका देऊन गरिबांची थट्टा केली आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी केला आहे.
महाराष्ट्राच्या खाद्य संस्कृतीत मक्का हे धान्य रोजच्या जेवणातील आहार नाही अशा वेळेस यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे स्वस्त राशन दुकानाच्या मार्फत गव्हाच्या ठिकाणी मक्का पुरवली जात आहे. अंत्योदय गटातील लोकांना प्रति कुटुंबामागे 15 किलो गहू आणि 20 किलो तांदूळ देत असतात. मात्र, यावेळी कडधान्याच्या रूपाने गव्हाऐवजी निकृष्ट दर्जाचा मका प्रती कुटुंब 10 किलो या प्रमाणे देण्यात आला. ज्यामध्ये कचरा, सोंडे, भरडलेला, काळपट जो जनावरेही खाणार नाही असा मका प्रति कुटुंब 10 किलो देण्यात आला. तसेच प्राधान्य गटातील कुटुंबांनाही अशाच प्रकारे मका देण्यात आला. जिल्हा पुरवठा अधिकारी जनतेला निकृष्ट दर्जाचे अन्न पुरवठा करीत आहे. अशा अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महेश पवार यांनी केली आहे.
तहसील कार्यालयात मका फेकून नागरिकांचा संताप
आजही सरकारी गोदामामध्ये लाखो क्विंटल गहू सडत असून तो गरिबांपर्यंत पोहोचत नाही. मग एवढा गहू असताना मका देण्याची गरज काय? असा सवाल महेश पवार यांनी केला आहे. गरिबांना मका ऐवजी तात्काळ गहू पुढच्या महिन्यापासून देण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश पवार यांनी केली तसेच संतप्त नागरिकांनी घाटंजी तहसील कार्यालयात मक्याची पेरणी केली आणि नंतर तहसील कार्यालयात मका फेकून नागरिकांनी आपला रोष व्यक्त केला.