Chitra Wagh : 'त्या' प्रकरणाचे मुख्य कर्णधार संजय राठोडच; माझी लढाई अजून संपलेली नाही: चित्रा वाघ
कोणी मंत्री असो वा नसो, आपली लढाई सुरूच राहणार आहे. म्हणूनच PIL दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर फारसे बोलता येणार नसल्याचे यावेळी चित्रा वाघ म्हणाल्या.
Chitra Wagh vs Sanjay Rathod : वर्षभरापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले पूजा चव्हाण प्रकरण अद्याप संपलेले नाही, ती महाराष्ट्राची मुलगी असून तिच्या आत्म्याला न्याय मिळवून देईपर्यंत आपली न्यायालयीन लढाई सुरूच राहणार आहे. तूर्तास, हा विषय राजकीयदृष्ट्या संपला असला तरी तो माझ्या दृष्टीने संपलेला नाही, असे स्पष्ट मत भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी व्यक्त केले. त्या आज येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या.
पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना वाघ म्हणाल्या, 'पूजा चव्हाण प्रकरणाचे मुख्य कर्णधार माजी वनमंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीच 'क्लिनचीट' दिली आहे. एका तरुण मुलीचा मृत्यू होतो आणि साधी तक्रारही नोंदविली जात नाही. या प्रकरणातील साक्षीदारांची साक्ष न घेताच त्यांना सोडून देण्यात आले.
ही लढाई न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार
माध्यमांनी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांनाच याबाबत जाब विचारला पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. ही लढाई केवळ पूजा चव्हाण हिची नसून महाराष्ट्रातील महिलांच्या अस्मितेची आहे. कोणी मंत्री असो वा नसो, आपली लढाई सुरूच राहणार आहे. म्हणूनच पूजा चव्हाण प्रकरणात न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल केली आहे. हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर फारसे वक्तव्य करणे योग्य नाही. पूजा चव्हाण हिच्यासाठी लढणारी चित्रा वाघ हीच असून आता ही लढाई न्याय मिळेपर्यंत सुरूच राहणार आहे. पूजा चव्हाण प्रकरणात खरा गुन्हेगार कोण आहे, असे विचारले असता या प्रकरणात संजय राठोड हेच खरे कर्णधार असल्याचा पुनरुच्चार चित्रा वाघ यांनी केला.
राठोड हे शिंदे गटाचे मंत्री
महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस यांचे संयुक्त सरकार आहे. संजय राठोड हे शिंदे गटाचे मंत्री आहेत. पक्ष कार्यकर्ता म्हणून मी हा विषय राजकीय दृष्ट्या संपवला असला तरी तो माझ्या दृष्टीने सुरूच राहील, असे स्पष्टीकरण चित्रा वाघ यांनी यावेळी दिले.
हेही वाचा