CM-Governor Meet : गेल्यावर्षी ट्विटरवर शुभेच्छा, यंदा प्रत्यक्ष भेट; राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार संघर्ष कमी होणार?
गेल्या वर्षी राज्यपालांना ट्विटरवरुन शुभेच्छा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी या वर्षी थेट त्यांना भेटून शुभेच्छा दिल्या. या भेटीमुळे शिवसेना आणि भाजपची जवळीक वाढते का असा अनेकांना प्रश्न पडलाय.
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज थेट राजभवनावर जाऊन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना शुभेच्छा दिल्या आहेत. भगतसिंग कोश्यारी महाराष्ट्राचे राज्यपाल झाल्यापासून महाराष्ट्रात हा त्यांचा दुसरा वाढदिवस साजरा होतोय. गेल्यावर्षी वाढदिवसाच्या दिवशी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी मुंबई मध्येच होते मात्र त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना ट्विटर वरूनच शुभेच्छा देणं पसंत केलं. उद्धव ठाकरे गेल्यावर्षी राज्यपालांच्या भेटीला गेले नव्हते. यंदा मात्र वेगळे चित्र बघायला मिळालं आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्यक्ष राजभवनावर जाऊन राज्यपालांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून सुरू असलेला राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष कमी होतो का? हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मोदी भेटीनंतर उद्धव ठाकरे यांची राज्यपालांशी भेट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 जून रोजी दिल्लीवारी केली. मराठा आरक्षण आणि राज्यातील इतर मुद्द्यांवर उद्धव ठाकरे अजित पवार आणि अशोक चव्हाण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटले. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांची अर्धा तास वैयक्तिक भेट झाली. या भेटीचे बरेच राजकीय अर्थ काढले जात आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट झाल्यानंतर शिवसेना आणि भाजपची जवळीक होते का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. विशेष म्हणजे ही भेट ताजी असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने राजभवनावर जाऊन राज्यपालांना शुभेच्छा दिल्या. त्यामुळे शिवसेना आणि भाजपची गेल्या काही वर्षांपासून वाढलेली कटुता कमी होणार का? असा प्रश्न पडतोय.
खरंतर राज्यपाल नियुक्त बारा आमदारांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष सुरु आहे. याआधीही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी राज्य सरकारने विमान नाकारलं होतं. त्यावेळी हा संघर्ष उघडपणे चव्हाट्यावर आला होता, पण आता राज्यपालांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यामुळे उद्धव ठाकरे भाजपशी जुळवून घेण्याचा प्रयत्न तर करत नाहीत ना? असा प्रश्न पडतोय.
महत्वाच्या बातम्या :