Corona 3rd Wave: तिसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढू शकते, आरोग्य विभागाची माहिती, मुख्यमंत्री ठाकरेंच्या यंत्रणांना सूचना
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरीयंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्ण संख्या परत दुपट्टीने वाढू शकते.

मुंबई : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या. यासंदर्भात टास्क फोर्समधील डॉक्टर्स, वरिष्ठ अधिकारी यांच्या समवेतच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी टास्क फोर्सच्या डॉक्टर्सनी राज्यभर सिरो सर्व्हेक्षण करणे, मोठ्या प्रमाणावर लसीकरण पूर्ण करणे यावर भर देताना निर्बंधांचे पालन काटेकोरपणे होणे गरजेचे आहे असे सांगितले. गर्दी वाढली आणि आरोग्याचे नियम पाळले गेले नाहीत तर दुसऱ्या लाटेतून सावरता सावरता आपण महिन्या दोन महिन्यात तिसऱ्या लाटेलाही सामोरे जाऊ अशी अशी भीती व्यक्त केली.
पहिल्या लाटेच्या वेळेस आपल्याकडे सुविधांची कमी होती, त्यात आपण वाढ करीत गेलो, दुसऱ्या लाटेने देखील आपल्याला बरेच काही शिकविले. ही लाट ओसरत असून त्यातील अनुभवातून आपल्याला आवश्यक ती औषधी, आरोग्य सुविधा, बेड्स , ऑक्सिजन उपलब्धता या गोष्टींकडे लक्ष केंद्रित करावे लागेल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की ऑगस्ट- सप्टेंबर पासून देशाला 42 कोटी लसी मिळताहेत अशी माहिती मिळते आहे त्यामुळे लसीकरण वेगाने सुरु होऊन महाराष्ट्रालाही त्याचा फायदा होईल. लसीकरण हा या लढाईत महत्वाचा भाग असला तरी आरोग्य विषयक नियमांचे पालन करणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे हे अत्यावश्यक आहे.
या बैठकीत पुढच्या काळात लागणारी संभाव्य औषधे, त्यांची खरेदी , त्यासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद, आरटीपीसीआर कीट, मास्क, पीपीई किट्स अशा बाबींवर विस्तृत चर्चा झाली, मुख्यमंत्र्यांनी सर्व सबंधित यंत्रणांनी समन्वयाने हे उपलब्ध राहील असेही सांगितले.
तिसऱ्या लाटेत रुग्ण संख्या वाढू शकते
पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत अतिशय कमी कालावधीत रुग्ण संख्या दुप्पट झाली. नव्या डेल्टा प्लस व्हेरीयंटचाही धोका असल्याने तिसरी लाट आल्यास राज्यात रुग्ण संख्या परत दुपट्टीने वाढू शकते. पहिल्या लाटेत 19 लाख रुग्ण होते, दुसऱ्या लाटेत ही संख्या 40 लाखापेक्षा जास्त झाली होती. सक्रीय रुग्णांची संख्याही 8 लाख होऊ शकते तसेच 10 टक्यांच्या आसपास संसर्गग्रस्त मुलांची संख्या असू शकते असे आरोग्य विभागाने सादरीकरणात सांगितले.
17 सप्टेंबर 2020 रोजी पहिल्या लाटेत सर्वाधिक म्हणजे 3 लाख 1 हजार 752 रुग्ण होते. तर 22 एप्रिल 2021 मध्ये दुसऱ्या लाटेत सर्वोच्च रुग्ण संख्या 6 लाख 99 हजार 858 होती. 13 सप्टेंबर 2020 रोजी सर्वाधिक 517 मृत्यू झाले होते. दुसऱ्या लाटेत 26 एप्रिल 221 रोजी सर्वाधिक 1110 मृत्यू झाले. साप्ताहिक पॉझिटीव्हिटी 9 सप्टेंबर 2020 रोजी सर्वाधिक म्हणजे 23.53 टक्के होती तर दुसऱ्या लाटेत 8 एप्रिल 2021 रोजी 24.96 टक्के पॉझिटीव्हिटी दर होता. युके व इतर काही देशांत परत विषाणूचा संसर्ग वाढून निर्बन्ध कडक करण्याची वेळ येते आहे याकडेही टास्क फोर्सने लक्ष वेधले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
