महाराष्ट्र, बंगाल वगळता इतर राज्यात ईडीला काम नाही का?, मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं
Uddhav Thackeray : पश्चिम बंगाल, महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यात तपास यंत्रणांना काम नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे.
Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी भाजपवर आणि फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे. पश्चिम बंगाल, महाराष्ट्र सोडला तर इतर राज्यात तपास यंत्रणांना काम नाही का? असा संतप्त सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केला आहे. लोकसत्ताच्या 74 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय तपास यंत्रणाच्या कारवायावरुन भाजपला इशारा दिला. आता तुमची वेळ आहे. घाला धाडी, प्रत्येकाचा दिवस असतो. लक्षात ठेवा अशा शब्दात मुख्यमंत्र्यांनी भाजपला ठणकावलं.
80 टक्के समाजकारण करण्यासाठी राजकारणात येणं गरजेचं आहे. देशाच्या हितासाठी सर्व पक्ष एकत्र येणार असतील तर त्यात शिवसेनाही असेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. सगळी सत्ता तुम्हाला द्यायची मग आम्ही काय फक्त धुणीभांडीच करायची का? देश, राज्य आणि पालिका तुम्हालाच पाहिजे. सगळं आम्हालाच पाहिजे ही वाईट वृत्ती आहे. या वृत्तीने देशाचं वातावरण नासून टाकलेय, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. केंद्र सरकार बहुमताने सत्तेत आले. केंद्राने संधीचे सोनं करावं, माती करु नये, असा टोला केंद्र सरकारवर उद्धव ठाकरे यांनी लगावला.
प्रत्येकाचा दिवस येतो, आमचाही येईल -
महाराष्ट्रात धाडीमागून धाडी सुरु आहेत, प्रत्येकाचा दिवस येतो, हे लक्षात ठेवा. ईडी अथवा तपास यंत्रणाचा वापर करुन त्रास दिला जातोय. महाराष्ट्रामध्ये गांज्याची शेती फुलली आहे, असे चित्र निर्माण करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्राला बदनाम करण्याचे षडयंत्र सुरु आहे. लोकशाही मार्गाने सत्ता मिळवा, मुस्कटदाबी करुन सत्तेत बसू नका. कुणीही कुणाला बांधील नसते, अन् असू नये. सत्ता मिळवताना लोकशाहीचा विसर पडू नये, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
फडणवीसांना टोला -
मी पुन्हा येणार असं म्हणून न येणं हे खूप वाईट आहे, असे म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांच्या मी पुन्हा येणार या विधानावर टोला लगावलाय. पण न सांगता येणं याची जास्त गंमत असते. पण सांगून न येणं वाईट आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
कोरोना काळातील कामावरही टीका -
कोरोनाचा काळ आव्हानात्मक होता. या काळातही कामे थांबली नाहीत. कोरोना काळात राज्याची सर्वोत्तम कामगिरी झाली आहे. कोरोना काळातील कामावरही टीका करण्यात आली, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
पुन्हा युती होणार का?
भविष्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ज्या पद्धतीने आज भाजप चाललं आहे त्या पद्धतीने गेल्यास युती होणार नाही. भाजपने वैचारिक पातळी गमावली आहे. कुणीच कुणाला बांधिल नसतं."