(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Uddhav Thackeray: सत्तेचा दुरुपयोग करुन सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासलं; उद्धव ठाकरेंची भाजपवर टीका
Uddhav Thackeray: भाजपच्या सत्तापिपासूपणामुळे आज केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडले आहेत असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई: सत्ता मिळवा पण ती लोकशाहीच्या मार्गाने मिळवावी. सगळं काही मलाच पाहिजे, सत्तेचा दुरुपयोग करुन पुन्हा सत्ता मिळवण्याच्या वृत्तीमुळे देशाचं राजकारण नासवलं आहे. हा सत्तापिपासूपणा जो काही आहे त्यामुळे केंद्र आणि राज्यांचे संबंध बिघडत आहेत अशी टीका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केली आहे. ते 'लोकसत्ता'च्या 74 व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमामध्ये बोलत होते.
उद्धव ठाकरे म्हणाले की, "देशाच्या राजकारणाला एक चांगली दिशा मिळाली पाहिजे. आम्ही गंगा स्नान करुन पवित्र आणि इतर सर्व गटारातले ही वृत्ती वाईट आहे. सत्तेसाठी हिदुत्वाचा वापर करणे हे चुकीचं आहे."
पुन्हा युती होणार का?
भविष्यात भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र येणार का या प्रश्नाचे उत्तर देताना उद्धव ठाकरे म्हणाले की, "ज्या पद्धतीने आज भाजप चाललं आहे त्या पद्धतीने गेल्यास युती होणार नाही. भाजपने वैचारिक पातळी गमावली आहे. कुणीच कुणाला बांधिल नसतं."
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सध्या तरी शिवसेना ही भाजपसोबत जाण्याची शक्यता नसल्याचं आपल्या उत्तरातून स्पष्ट केलं आहे. काही दिवसांत सरकार पडणार असं विरोधक म्हणायचे, पण आपण तीन वर्षे पूर्ण केल्याचं ते म्हणाले.
सगळंच तुम्हाला हवंय का?
उद्धव ठाकरे भाजपला उद्देशून म्हणाले की, "तुम्ही देश सांभाळा, आम्ही राज्य सांभाळतो. पण देश, राज्य आणि पालिकाही तुम्हालाच हवी आहे. मग आम्ही काय धुणी-भांडी करायची का?"
मी पुन्हा येईन असं म्हणून न येणं हे वाईट असल्याचा टोला उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीसांना लगावला.
महत्त्वाच्या बातम्या: