CM Eknath Shinde : मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते, मुख्यमंत्री शिंदेंची विरोधकांवर टीका
CM Eknath Shinde : शिर्डी येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना शिंदे यांनी ही टीका केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असतांना शिंदे यांनी ही टीका केली आ
अहमदनगर : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले असून, अहमदनगर जिल्ह्यातील अनेक विकासकामांचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या याच दौऱ्यावरून विरोधकांकडून टीका देखील करण्यात आली होती. तर, विरोधकांच्या याच टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले आहे. मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे अनेकांच्या पोटात दुखते असा खोचक टोला शिंदे यांनी लगावला आहे. शिर्डी येथील शेतकरी मेळाव्यात बोलतांना शिंदे यांनी ही टीका केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदी व्यासपीठावर असतांना शिंदे यांनी ही टीका केली आहे.
दरम्यान यावेळी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, पंतप्रधान मोदी ज्या कामाचे उद्घाटन करतात, तो प्रकल्प वायू वेगाने पुढे जाऊन पूर्ण होत असतो. अशा प्रकारचा आपल्याला अनुभव आहे. त्यांच्या हाताला यशाचा परीस असून, हात लावताच सोनं होते. त्यामुळे महाराष्ट्रातील भूमिपूजनासाठी आम्ही त्यांना वेळोवेळी बोलावत असतो. पण मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यामुळे काही लोकांच्या पोटात दुखते, पण त्यांच्याकडे आम्हाला काही बघायचं नाही. अशा पोट दुखणाऱ्या लोकांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु करण्यात आला आहे. याठिकाणी विनामूल्य उपचार देण्यात येतात, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.
आमचं सरकार येताच विकासकामांना चालना मिळाली...
राज्यात आमचं सरकार येण्यापूर्वी अडीच वर्षे महाराष्ट्रातील विकासकामे बंद होती. परंतु, आमचे सरकार येताच आम्ही त्याला चालना दिली आणि नवीन प्रकल्प देखील सुरु केले. राज्याचा विकास करण्यासाठी डबल इंजिन सरकारची आवश्यकता असते. राज्याच्या विकासासाठी पंतप्रधान मोदी यांच्याकडे ज्याकाही गोष्टी आपण मागितल्या, त्यांनी त्या सर्वकाही देण्याचं काम केले, असेही शिंदे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वागत...
शिर्डी येथे आयोजित विविध विकास प्रकल्पांच्या शुभारंभासाठी प्रधानमंत्री यांचे आज दुपारी भारतीय वायू दलाच्या विशेष विमानाने काकडी (शिर्डी) विमानतळ येथे आगमन झाले. तेथून हेलिकॉप्टरने साई संस्थानच्या हेलिपॅड येथे आगमन झाल्यावर प्रधानमंत्री मोदी यांचे राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी पुष्पगुच्छ देऊन पंतप्रधानांचे स्वागत केले. यावेळी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, खासदार सदाशिव लोखंडे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे,नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी शेखर पाटील यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.
इतर महत्वाच्या बातम्या: