Devendra Fadnavis on Nishikant Dubey: महाराष्ट्र धर्माला आव्हान देत मराठी माणसाला ललकारणाऱ्या भाजप खासदार निशिकांत दुबेंची मुंबईत 'सरकारी' बडदास्त ठेवली जाणार!
Devendra Fadnavis on Nishikant Dubey: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबे यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेऊ असं वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा वाद पेटला आहे.

Devendra Fadnavis on Nishikant Dubey: महाराष्ट्रातील सक्तीच्या हिंदी वरवंट्या विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत सरकारला निर्णय हाणून पाडायला भाग पाडले. मात्र, मराठी विरुद्ध हिंदी वाद सुरू असतानाच भाजप खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र विरोधात सातत्याने गरळ ओकली होती. इतकेच नव्हे तर पटक पटक के मारेंगे म्हणत मराठी माणसाला ललकारण्याचा सुद्धा प्रयत्न केला. याच निशिकांत दुबे विरोधात महाराष्ट्रामध्ये अत्यंत आक्रमक वातावरण आणि संतापाची भावना असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुबे यांच्या मुंबई दौऱ्यात त्यांच्याशी गैरवर्तन होणार नाही, याची काळजी घेऊ असं वक्तव्य केल्याने पुन्हा एकदा वाद पेटला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना खासदार संजय राऊत आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी पलटवार केला आहे.
हे मराठी भाषेचे विरोधक आहेत
अंबादास दानवे यांनी म्हटले आहे की याचा अर्थ स्पष्ट आहे हे मराठी भाषेचे विरोधक आहेत. लातों का भूत बातों से नही मानता. दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सुद्धा निशिकांत दुबेच्या स्वागतावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. राऊत यांनी महाराष्ट्र द्रोही असल्याचे म्हणत हल्लाबोल केला. महाराष्ट्राच्या क्षेत्रासाठी पायघड्या घालणार आहेत, त्यांना महाराष्ट्रातील खासदारांची चिंता नाही. महाराष्ट्रावर मराठी माणसावर थुंकतात, त्यांची त्यांना चिंता नाही.
महिला खासदारांनी संसदेत निशिकांत दुबे यांना घेराव घातला
दुसरीकडे, महाराष्ट्राच्या महिला खासदारांनी संसद भवनाच्या लॉबीमध्ये भाजप खासदार निशिकांत दुबे यांना घेराव घालत महाराष्ट्र धर्माची आठवण करून दिली होती. महिला खासदारांनी 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा दिल्या. महिला खासदारांनी निशिकांत दुबे यांना त्यांच्या विधानावर विचारणा केली होती. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड, शोभा बच्छाव आणि प्रतिभा धानोरकर यांनी दुबे यांच्यासमोर 'जय महाराष्ट्र'च्या घोषणा दिल्या आणि त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही मराठी माणसांना मारण्याची भाषा कशी बोलू शकता? कोणाला आणि कशी मारहाण कराल? महिला खासदारांनी सांगितले की तुमचे लोकांविरुद्धचे वर्तन आणि भाषा सहन केली जाणार नाही. निशिकांत दुबे कोणतीही प्रतिक्रिया न देता तेथून निघून गेले. मराठी मुद्द्यावर निशिकांत दुबे यांना घेराव घालणाऱ्या महिला खासदारांना राज ठाकरे यांनी पत्र पाठवत अभिनंदन केले होते.
इतर महत्वाच्या बातम्या























