Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवारांना राज्यसभेची उमेदवारी, नाराजीच्या चर्चांवर खुद्द भुजबळांचे स्पष्टीकरण, म्हणाले...
Chhagan Bhujbal : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. यावर आता छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. मात्र यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नाराजीनाट्य सुरु असल्याचे बोलले जात होते. मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीवरून नाराज असल्याच्या चर्चा सुरु होत्या. आता नाराजीवर खुद्द छगन भुजबळ यांनी स्पष्टीकरण दिले आहे.
छगन भुजबळ म्हणाले की, सुनेत्रा पवारांना राज्यसभेसाठी उभे करायचे आहे, असा निर्णय सर्वानुमते झालेला आहे. मी या निवडणुकीसाठी इच्छुक होतो, माझ्यासोबत आनंद परांजपे, बाबा सिद्धीची देखील इच्छुक होते. मात्र चर्चेअंती सर्वानुमते सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उभे करण्याचा निर्णय घेतला.
हा निर्णय आमच्या सगळ्यांचा
राष्ट्रवादीत अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री आहेत. लोकसभेच्या पराभवानंतर सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेतले जात आहे. एकाच परिवाराला इतके पद आहेत. याबाबत तुमचं मत काय? असे विचारले असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यांचा काय प्रश्न आहे. अजित दादांनी कुठे काय म्हटले आहे. आमच्या नेत्यांनी हे ठरवले आहे. त्यात अजित दादांना बोलण्यात काय अर्थ आहे. हा आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे.
मी नाराज वगेरे काही नाही
पक्षाच्या निर्णयाच्या कार्यप्रणालीवर तुम्ही नाराज आहात का? असे विचारले असता माझ्या तोंडावरून मी तुम्हाला नाराज दिसत आहे का? असा सवाल भुजबळांनी उपस्थित केला. मी नाराज वगेरे काही नाही. पक्षामध्ये सर्वांना एकत्र घेऊन चर्चा करून निर्णय घायचे असतात. हे मी गेल्या 57 वर्षांपासून शिकत आहे. प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणेच होते असे नाही.
सुनेत्रा पवार सहज निवडून येतील
उमेदवार जाहीर करायला वेळ मिळणे अपेक्षित असते. या प्रकरणात जाणीवपूर्वक उमेदवार जाहीर केला गेला नाही. याचा अर्थ उमेदवार आधीच ठरला होता का? असे विचारणा केली असता छगन भुजबळ म्हणाले की, त्यात वेळ काय मिळायची, त्यांना कुठे प्रचार करायला जायचे आहे का? सर्व आमदारच मतदान करणार आहेत. महायुतीचे आमदार मोठ्या प्रमाणात आहेत. त्यामुळे सुनेत्रा पवार सहज निवडून येतील. मला वाटत नाही की, विरोधी पक्षाकडून कोणी फोर्म भरेल.
सर्वानुमते निर्णय घेतला
पक्षात नाराजी आहे का? पक्षातील एक गट म्हणतोय की, सुनेत्रा पवारांना अचानक उमेदवारी देण्यात आली. तुमच्या पक्षातून जवळपास 13 जण इच्छुक होते. तरीही सुनेत्रा पवारांना अचानक उमेदवारी देण्यात आली. प्रफुल्ल पटेल यांच्या वेळेस देखील पक्षात नाराजी पाहायला मिळाली, असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, 13 लोक इच्छुक होते. पण 13 लोकांना उभे करणे शक्य आहे का? कुणाला एकालाच आपण उभे करणार. सगळ्यांनी निर्णय घेतला की, सुनेत्रा पवारांना उभे करा, असे त्यांनी म्हटले.
आणखी वाचा