कवठेमहांकाळ तालुक्यातील बैलगाडी शर्यती घेणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
कवठेमहांकाळ तालुक्यात बैलगाडी शर्यती घेणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सांगली : बैलगाडी शर्यतीला शासनाची व न्यायालयाची बंदी असताना कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकूड( एस) व ढालगांव येथे बैलगाडी शर्यती घेण्यात आली. या आरोपावरून कवठेमहांकाळ येथील सात जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
ढालगांव येथे 17 मार्च रोजी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ढालगांव ते हिवरे रस्त्यावर बेकायदेशीरपणे बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. तर 21 रोजी सकाळी तालुक्यातील अलकूड (एस) येथील खडीचा माळ याठिकाणी बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत सांगली येथील प्राणी मित्र संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
बेकायदेशीर बैलगाडी शर्यतीची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांनी घटनेची गांभीर्याने दखल घेतली आणि वरील दोन्ही ठिकाणी बैलगाडी शर्यती आयोजित करणाऱ्या सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करून तातडीने सहा जणांना ताब्यात घेतले आहे.
अलकूड (एस) येथील शर्यती प्रकरणी आयोजक अर्जून कृष्णा भोसले, सतीश बाबासाहेब चौगुले व भावड्या दुधाळ सर्व रा. अग्रण धुळगाव या तिघांना पोलिसानी ताब्यात घेतले आहे. तर ढालगांव येथील बैलगाडी शर्यतीचे आयोजक नवनाथ लोभा खुटाळे, रणजित पाटील व संभा कोनूर सर्व रा. ढालगाव यांना ताब्यात घेतले आहे. तर समाधान जगन्नाथ सरगर रा. ढालगांव याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, सरगर अद्याप फरारी आहे. पोलिस ठाण्यात सोमवारी रात्री उशीरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मनोज पाटील अधिक तपास करीत आहेत.