One Station One Product : धारावीत बनवलेल्या चामड्याच्या वस्तूंची विक्री सीएसएमटी स्थानकावर! कारागिरांच्या कलेला मिळणार ओळख
One Station One Product : या संकल्पनेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर स्थानिक उत्पादनाचा प्रचार करणे, तसेच त्या भागात विक्री केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे.
One Station One Product : ‘वन स्टेशन वन प्रॉडक्ट’ योजनेंतर्गत धारावीमध्ये बनवलेल्या चामड्याच्या उत्पादनांची विक्री आता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज स्थानकावर होणार आहे. या संकल्पनेच्या माध्यमातून भारतीय रेल्वेच्या प्रत्येक स्थानकावर स्थानिक उत्पादनाचा प्रचार करणे, तसेच त्या भागात विक्री केंद्र बनवण्याचे उद्दिष्ट आहे. रेल्वे स्थानकावर दुकान सुरू करून, देशातील विविध शहरांमध्ये बनवलेल्या स्थानिक उत्पादनांच्या जाहिरातीबरोबरच ते विक्रीसाठी जोडले जावे. जेणेकरून कारागिरांच्या कलेला ओळख मिळून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील. यंदाच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी स्वावलंबी भारत मोहिमेला प्रोत्साहन देण्यासाठी "वोकल फॉर लोकल" आणि "वन स्टेशन वन प्रॉडक्ट" चा उल्लेख केला होता.
रोजगाराच्या नवीन संधी निर्माण
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे सीपीआरओ शिवाजी सुतार यांच्या मते, या उपक्रमाचे मुख्य उद्दिष्ट सामान्य लोकांना त्यांच्याच शहरात बनवलेल्या स्थानिक उत्पादनांकडे आकर्षित करणे आहे. मध्य रेल्वेच्या 5 वेगवेगळ्या ठिकाणी प्रसिद्ध स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देणाऱ्या स्थानिक उत्पादनांचे स्टॉल्स लावण्यास परवानगी देण्यात आली आहे. या ठिकाणी पुणे विभागातील कोल्हापूर (छत्रपती शाहू महाराज टर्मिनस) स्थानकावर 'वन स्टेशन वन प्रॉडक्ट' अंतर्गत कोल्हापुरी चप्पल असतील. भुसावळ विभागातील बुर्हाणपूर स्थानकातील स्थानिक हस्तकला, सोलापूर स्थानकावर सोलापुरी चादर (वस्त्र) आणि नागपूर स्थानकावर बांबू उत्पादने यांचे प्रदर्शन व प्रचार करण्यात आले आहे. स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी 'वन स्टेशन वन प्रोडक्ट' योजनेअंतर्गत सुरुवातीला 15 दिवस स्थानकांवर स्टॉल लावण्यात आले आहेत. त्याचवेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकावरील धारावी लेदर प्रोडक्ट्स स्टॉलवर स्थानिक चामड्याच्या उत्पादनांचे प्रदर्शन आणि विक्री करण्यात येत आहे.
या मोहिमेमुळे कारागिरांच्या उत्पादनांना ओळख मिळेल.
या मोहिमेमुळे स्थानिक कारागिरांचा उदरनिर्वाह होणार असून, रेल्वे स्थानकावर हे दुकान सुरू केल्याने प्रवाशांचेही लक्ष त्यांच्याकडे जाईल, त्यामुळे कारागिरांनाही मोठा फायदा होणार आहे. त्याच खरेदीदारांना स्थानकावरच स्थानिक वस्तू मिळू शकतील आणि त्यांनाही लाभ मिळेल. स्थानकावर दुकाने थाटणारे व्यापारी देखील रेल्वेच्या या उपक्रमाबद्दल खूप आनंदी आहेत आणि ते म्हणतात की, या मोहिमेमुळे त्यांच्या उत्पादनांना लाखो लोकांमध्ये ओळख मिळेल.