Nagpur : नागपूरजवळ कोराडीत उभारणार मध्य भारतातील पहिले अवयव प्रत्यारोपण केंद्र; काय असतील सुविधा
दिवाळीच्या मुहूर्तावर मंगळवारी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष बावनकुळे यांनी याबाबतचा हस्तांतर करारावर स्वाक्षरी केल्या.
Nagpur News : शहरानजीकच्या कोराडी येथील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिराच्या परिसरात मध्य भारतातील पहिले अवयव प्रत्यारोपण केंद्र (organ transplantation) होणार आहे. येथील 164 खोल्यांच्या भक्तनिवासात श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स अँड मल्टीऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पिटल उभारले जाणार आहे. हॉस्पिटलसाठी इमारत हस्तांतरण सोहळा काल पार पडला. यामाध्यमातून मध्य भारतात (India) प्रथमच ऑर्गन ट्रान्सप्लॉंटची सुविधा उपलब्ध होणार असून त्याचा लाभ जनतेला होणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी दिली.
श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरात दिवाळीच्या शुभमुहूर्तावर मंगळवारी नागपूर (Nagpur) महानगर प्रदेश विकास प्राधिकरणचे आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी व मंदिर संस्थानचे अध्यक्ष बावनकुळे यांनी याबाबतचा हस्तांतर करारावर स्वाक्षरी केल्या. यावेळी अप्पर आयुक्त अविनाश कातडे, अधीक्षक अभियंता प्रशांत भांडारकर, कार्यकारी अभियंता कल्पना इखार, सहाय्यक अभियंता नेपाल भाजीपाले व वास्तुविशारद निशीकांत भिवगडे, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी राघवेंद्र टोकेकर उपस्थित होते.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, नागपूर मध्य भारतातील हेल्थकेअर हबकडे वाटचाल करीत आहे. तथापि, येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंटसाठी सुविधा नसल्याने रुग्णांना हैदराबाद, मुंबई व चेन्नईकडे जावे लागते. यात मोठा खर्च होत असल्याने हा उपचार अत्याधिक खर्चीक होता. त्यामुळे नागपूर येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंट सुविधा निर्माण व्हावी, अशी मागणी केली जात होती. नागपूर नजीकच्या कोराडी येथे ऑर्गन ट्रान्सप्लॉंट सुविधा निर्माण करण्याची कल्पना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या मार्गदर्शनातून स्वीकारली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हॉस्पिटलच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी या हॉस्पिटलच्या परवानगीसाठी विशेष प्रयत्न केले. कोराडी संस्थानचे भक्तनिवास यासाठी देण्यात यावे, अशी मागणी नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणकडे केली होती. त्याला प्रतिसाद मिळाला व आता भक्तनिवासाचे रूपांतर श्री महालक्ष्मी जगदंबा हार्ट, लंग्स अँड मल्टिऑर्गन ट्रान्सप्लॉंट हॉस्पिटलमध्ये होणार आहे. या हॉस्पिटलचा नागपूर, विदर्भासह संपूर्ण राज्य तसेच आजूबाजूच्या राज्यातील रुग्णांना देखील लाभ मिळणार आहे.
असे असेल हॉस्पिटल
- 9142 चौ.मी.चा विस्तीर्ण परिसर
- 12,519.25 चौ.मी क्षेत्रात बांधकाम
- 164 सर्व सुविधायुक्त खोल्या
- 8 माळ्याची इमारत
- ग्रंथालय, रेस्टॉरेंट, जिम्नॉशिअम, योगा रूम
इतर महत्त्वाची बातम्या