टोलमाफीचा निर्णय रद्द करा, आरटीआय कार्यकर्त्याची पंतप्रधानांकडे तक्रार
महाराष्ट्रातील टोलवसुली विरोधात लढा देणारे आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी ही देशभरातील टोलमाफी तात्काळ रद्द करावी अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.
मुंबई : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालेला असताना या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आपत्कालीन प्रसंगात काम करणं अधिक सोपं व्हावं यासाठी देशातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी जाहीर केली आहे. मात्र सध्या रस्त्यांवर केवळ आपत्कालीन वाहानांनाच परवानगी असताना टोलनाक्यांवर गर्दी होण्याचा प्रश्नच कुठे होतो? असा सवाल करत महाराष्ट्रातील टोलवसुली विरोधात लढा देणारे आरटीआय कार्यकर्ता प्रवीण वाटेगावकर यांनी ही देशभरातील टोलमाफी तात्काळ रद्द करावी अशी मागणी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे. या निर्णयामुळे एक प्रकारे कंत्राटदाराला सध्या होणारं नुकसान सरकारकडूनं वसुल करण्याचा अधिकार मिळणार आहे.
जेव्हा सरकार अशाप्रकारे टोलमाफी जाहीर करते, तेव्हा करारनाम्यानुसार कंत्राटदार हा या काळात रोजच्या हिशोबानुसार होणारी नुकसान भरपाई मागण्यास पात्र होतो. नोटबंदीच्या काळात महाराष्ट्र सरकारनं आधी टोलमाफी जाहीर केली आणि नंतर 24 दिवसांची टोल कंत्राटदारांची नुकसान भरपाई म्हणून 145 कोटी देण्याची तयारीही दर्शवली होती. तेव्हा अशाप्रकारे टोलमाफी देणं म्हणजे सर्वसामान्य जनतेच्या पैशांचा दुरूपयोग असल्याचा आरोप या पत्रातून केला गेला आहे.
केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीत देशातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाक्यांवर टोल घेणं तात्पुरत्या स्वरुपात बंद केलं आहे. या दरम्यान रस्त्यांची दुरुस्ती आणि टोल प्लाझांवर आपत्कालीन सुविधा या दरम्यान सुरूच राहतील. कोरोनामुळे सध्या देशभरात 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या दरम्यान हायवे तसेच राज्यांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत. या काळात केवळ आपत्कालीन सेवांसाठी काम करणाऱ्या वाहनांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणारी वाहनं, अत्यावश्यक सेवांशी संबंधित सरकारी वाहनं आणि रूग्णवाहिका अशा सेवांशी संबंधित वाहनांनाच सध्या प्रवासाची परवानगी देण्यात आली आहे. गडकरी यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे या आपत्कालीन सेवांमध्ये कार्यरत वाहनांना सेवा पुरवण्यासाठी कमीत कमी वेळ लागेल ही या मागची भूमिका आहे. मात्र जर रस्त्यांवर खासगी वाहनंच नाहीत तर आपत्कालीन वाहनांना अधिक वेळ लागणारच कसा?, असा सवाल वाटेगावकर यांनी आपल्या पत्रात विचारला आहे.
Corona Effect | देशभरात पुढचे काही दिवस टोलमाफी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची माहिती
संबंधित बातम्या :
देशभरातील सर्व टोलनाक्यांवर तात्पुरती टोलमाफी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची घोषणा