CAA Protest | परभणीत हिंसाचारप्रकरणी 50 जणांना अटक, राष्ट्रवादीच्या नगरसेवकावरही गुन्हा दाखल
परभणीतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील हिंसक आंदोलनप्रकरणी 50 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंगोलीतील कळमनुरी दगडफेक प्रकरणी 150 जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर बीडमध्ये 31 जणांना अटक करण्यात आली असून 103 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परभणी : परभणीतील नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधातील आंदोलनाला काल हिंसक वळण लागलं. या हिंसाचारप्रकरणी 50 जणांना अटक करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि एमआयएमचे विधानसभा उमेदवार अली खान यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलन झाल्यापासून अली खान फरार आहे. राष्ट्रवादीनेही त्यांच्यावर अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याप्रकरणी झालेल्या आंदोलनप्रकरणी नवा मोंढा, कोतवाली, नानल पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. तिन्ही पोलीस ठाण्यात अनेकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दंगल घडवणे, शासकीय मालमत्तेचं नुकसान करणे, दगडफेक करणे इत्यादी कलमान्वये हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ज्यांनी कायदा हाती घेतला त्यांच्यावर कारवाई होणारच, असं परभणीचे पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी सांगितलं आहे.

नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात परभणी, पूर्णा, मानवत, पालम शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला होता. ईदगाह मैदानावरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा पवित्रा या आंदोलकांनी घेतला. शिवाय पोलिसांवर दगडफेक सुरु केली. एवढंच नाही तर पोलीस अधीक्षक कार्यालया समोरील घर, दुचाकी,ऑटो चारचाकी शिवाय अग्निशमन दलाची गाडीही काही आंदोलकांनी फोडली. यावेळी पोलिसांना आंदोलकांना पांगवण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. मात्र आंदोलनकांनी केवळ पोलीस अधीक्षक कार्यालयच नाही तर नारायण चाळ, शिवाजी चौक आदी परिसरात ही दगडफेक करत नुकसान केलं आहे.
कळमनुरी दगडफेक प्रकरणी 150 जनांवर गुन्हे दाखल
हिंगोलीतील कळमनुरी येथील दगडफेक प्रकरणी 150 जनांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याप्रकरणी 20 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एसटी बस, अग्निशमनदलाची गाडी, खाजगी वाहने व दुकानावर दगडफेक आणि पोलिसांवर दगडफेक करून सरकारी मलमतेचे नुकसान आणि हिंसाचार केल्याप्रकरणी हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कळमनुरीमध्ये एसटी बस आणि खाजगी वाहनांची जमावाने तोडफोड केली होती. या टोळक्यांनी पोलिसांवर देखील दगडफेक केली आहे. त्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज देखील करावा लागला.बीडमध्ये 31 जणांना अटक, 103 जणांवर गुन्हे दाखल
बीडमध्ये आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकप्रकरणी पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे. आज 31 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात 103 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे आरोपींवर 307 अर्थात हत्या करण्याचा प्रयत्न असे गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. काल नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला. मात्र काही लोकांनी अचानक दगडफेक करण्यास सुरुवात केली. त्यामुळे बीडमधील आंदोलनाला गालबोट लागलं.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
