Bullock Cart Race LIVE : राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी, वाचा प्रत्येक अपडेट्स
Bullock Cart Race : Bailgada Sharyat Latest Updates बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवण्याबाबत महत्वाचा निर्णय झालाय. सुप्रीम कोर्टानं महत्वाचा निर्णय देत बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवली आहे
LIVE
Background
पुणे विमानतळावर आमदार महेश लांडगे यांचे जल्लोषात स्वागत
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतींना सर्वोच्च न्यायालयाने सशर्त परवानगी दिली. या लढ्याचे नेतृत्तव करणारे आमदार महेश लांडगे आणि अखिल भारतीय बैलगाडा संघटनेचे पदाधिकारी नवी दिल्ली येथून पुणे विमानतळावर आगमन झाले. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बैलगाडा शर्यतप्रेमी यांनी जल्लोषात स्वागत केले.
बैलगाडी शर्यती दरम्यान शेतकऱ्यांवर दाखल झालेले गुन्हे लवकर मागे घ्या-गोपीचंद पडळकर
न्यायालयाने बैलगाडी शर्यत सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता आता सरकारने बैलगाडी शर्यती दरम्यान शेतकऱ्यांवर दाखल असलेले गुन्हे 8 दिवसांच्या आत मागे घ्यावेत, अशी मागणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकारला केली आहे.
हा शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय- नाना पटोले
सुप्रीम कोर्टाने बैलगाड़ी शर्यातीवरील बंदी उठविल्यानंतर हा शेतकऱ्यांच्या लढाईचा विजय असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. यावेळी मंत्री सुनील केदार यांनी सतत पाठपुरावा केल्याचा उल्लेख नानांनी आवर्जून केला. शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी असून सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो, असंही नाना पटोले म्हणाले.
बळीराजाचे सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले...! - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
मुंबई : बैलगाडी शर्यंतीवरील बंदी उठविण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे आपल्या पशूधनाची जीवापाड सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यांचे म्हणजचे बळीराजाचे आपल्या सर्जा-राजावरील प्रेमच जिंकले, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रीया व्यक्त केली आहे. आपली संस्कृती आणि परंपरा टीकवून ठेवणाऱ्या या शर्यंतीसाठी अखेरपर्यंत चिवटपणे लढा देणाऱ्या पशूप्रेमींचेही मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
मुख्यमंत्री या संदेशात म्हणतात, बैलगाडी शर्यत ही पशूपालक आणि पशूधनावर जीवापाड प्रेम करणाऱ्या बळीराजाची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. आपल्या संस्कृतीत पशूधनालाही दैवताचे स्थान आहे. यातून पशूधनाचे जतन, संवर्धनाचाही विचार केला गेला आहे. शर्यंतीमधून या सगळ्या बाबींना प्रोत्साहन मिळत असे. शर्यंती सुरू व्हाव्यात यासाठी दीर्घ असा आणि चिवटपणे लढा द्यावा लागला. त्यामागेही बळीराजाचे आपल्या पशूधनावरील प्रेमाचे बळच होते. शर्यती, असोत किंवा नसोत, आपले पशूपालक या पशूधनाची पोटच्या लेकरांप्रमाणे काळजी घेतात, हे सर्वांनाच माहित होते. आता शर्यती सुरु होतील, त्यामधून आपल्या लोकपरंपरेचे आणि पशूधनाची वैभवही सगळ्यांना पाहता येईल.
शर्यती पुन्हा सुरू व्हाव्यात, पण त्यामध्ये गैर प्रकार आणि पशूधनाचा कदापीही छळ होऊ नये. त्याबाबत घालून दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन केले जावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यानी केले आहे.
शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात परवानगी, बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा - पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार
मुंबई दि. 16 :- राज्य शासनाच्या पाठपुराव्याने बैलगाडा शर्यतीला महाराष्ट्रात अखेर परवानगी मिळाली आहे.बैलगाडा प्रेमींना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा दिलासा मिळाला आहे. बैलगाडा शर्यती राज्यात पुन्हा सुरू करण्याचे बैलगाडा प्रेमींना आश्वासन दिले होते, त्याची पुर्तता आज झाली असून या निर्णयामुळे मी समाधानी असून आनंद व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय आणि क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिली.
मंत्री श्री.केदार म्हणाले, गेली 4 वर्षापासून बैलगाडा शर्यत बंद होती. शासनाने बैलगाडी शर्यत प्रेमींना आश्वस्त करुन, न्यायालयात शेतकऱ्यांची सक्षमपणे बाजू मांडली. बैलगाड्या शर्यती हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळयाचा विषय होता या निर्णयामुळे ते आनंद व्यक्त करीत आहेत. बैलांवर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने या निर्णयामुळे त्यांना अर्थिक हातभार लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बैलगाड्या शर्यती बाबत सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी झाली. महाराष्ट्र शासनाच्या वतीने ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी तसेच ॲड.सचिन पाटील यांनी युक्तिवाद केला. सर्वोच्च न्यायालयाने सर्व पक्षकारांच्या बाजू ऐकून घेतल्या. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली यांनी बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय यांनी २०१४ मधील आदेशातील तरतुदीचा विचार करून तसेच महाराष्ट्र राज्याने २०१७ साली बैलगाडा शर्यतबाबत केलेला कायदा व त्या अंतर्गत गठित नियमावलीची कठोर अंमलबजावणी करण्याच्या अधीन राहून महाराष्ट्र, कर्नाटक व तमिळनाडू या राज्यासाठी समान न्याय गृहीत धरून बैलगाडा शर्यतीसाठी मुंबई उच्च न्यायालयाने दिलेली स्थगिती उठवून राज्य शासनाने बैलगाड्या शर्यतीच्या बाबतीत १९६० चा कायद्याला अनुसरून जी नियमावली केली आहे, त्या नियमावलीला अधीन राहून बैलगाडा शर्यती सुरू करण्यास परवानगी दिलेली असल्याचे मंत्री श्री.केदार यांनी सांगितले.