केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांच्याच जिल्ह्यात अवैध सोनोग्राफीचा सुळसुळाट; कारवाई संशयाच्या भोवऱ्यात?
गेल्या आठवड्यात बुलढाणा शल्य चिकित्सक यांच्या पथकाने मेहकर येथील अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड टाकली होती. मात्र सोनोग्राफी सेंटर वरील ही धाड दिखावा तर नाही ना? असा संशय आता व्यक्त केला जातोय.
Buldhana News बुलढाणा : गेल्या आठवड्यात बुलढाणा शल्य चिकित्सक यांच्या पथकाने पोलिसांच्या मदतीने मेहकर येथील अवैध सोनोग्राफी सेंटरवर धाड टाकली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे याठिकाणी अवैधरित्या गर्भलिंग निदान चाचणी (Illegal Pregnancy Test) सुरू असल्याची माहिती मिळताच ही कारवाई करण्यात आली होती. यात अवैध सोनोग्राफी होतं असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी (Buldhana Police) PCPNDT कायद्या अंतर्गत गुन्हे दखल केले असून आतापर्यंत या प्रकरणात तिघांना अटकही केली आहे.
जिल्हा शल्य चिकित्सक आणि पोलिसांची कारवाई संशयाच्या भोवऱ्यात
या अवैध सोनोग्राफी सेंटर प्रकरणात विशेष बाब म्हणजे, या प्रकरणात ज्यांना अटक केली आहे या तिघांचाही वैद्यकीय क्षेत्राशी कुठलाही संबंध नाही. मग शल्य चिकित्सक आणि पोलिसांनी अटक केलेले ते तिघे कोण? यावर अनेक प्रश्न आता उपस्थित केले जात आहेत. या सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग निदान करण्यात येत होत ते कोण करत होतं? वैद्यकीय क्षेत्राशी संबंध नसलेल्या मुख्य आरोपी शिवा गरड याला गर्भलिंग निदान चाचणी कशी करायची हे कुणी शिकविलं? या सोनोग्राफी सेंटरवर ग्राहक पाठविणारे डॉक्टर्स कोण? यात गुंतलेल्या डॉक्टरांची चौकशी पोलीस कधी करणार? असे अनेक सवाल आता उपस्थित राहत आहेत.
याच परिसरातीलच नव्हे तर राज्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून गर्भलिंगनिदानासाठी या ठिकाणी ग्राहक येत असल्याची माहितीही पुढे येऊ लागली आहे. पोलिसांनी अटक केलेले तिघेही वैद्यकीय क्षेत्राशी निगडित नाहीत. मात्र या प्रकरणातील मोठे मासे असलेले डॉक्टर्स किंवा या सोनोग्राफी सेंटरवर गर्भलिंग निदान करण्यासाठी पाठविणारे अद्यापही मोकाट आहेत. त्यामुळे जिल्हा शल्य चिकित्सकांनी पकडलेल्या अवैध सोनोग्राफी सेंटरच्या कारवाईत फक्त दिखावा तर नाही ना? असा संशय आता उत्पन्न होत आहे. तर दुसरीकडे केंद्रीय कुटुंब कल्याण व आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्याच जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या सामान्य रुग्णालयात हे भीषण वास्तव समोर आल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्ते केले होते. त्यामुळे आता या प्रकरणी नेमकी काय कारवाई केली जाते, हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या