मंत्री असताना कोट्यवधींचा निधी दिला, आता घाणीत राहण्याची वेळ, माजी मंत्र्याची नागपुरात परवड!
आज राजकारणाच्या माध्यमातून छोटे पद मिळवणारे राजकीय कार्यकर्ते ही कोट्यवधींच्या बंगल्यात राहताना आपण पाहतो. मात्र, 5 वर्ष उत्तरप्रदेश सारख्या राज्यात मंत्रिपद भूषविणारे, मंत्री असताना आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी विविध कामांसाठी देणारे यशवंत निकोसे अवघ्या तीस-चाळीस हजार रुपयांच्या कामासाठी महापालिकेत अनेक चकरा मारतायेत.
नागपूर : सरकारी कार्यालयांमध्ये सामान्य नागरिकांचे कामं होत नाही. मात्र, त्याच वेळी राजकीय नेत्यांची कामं चटकन होतात.असाच सर्वसामान्यांचा अनुभव असतो. मात्र, आज आम्ही तुम्हाला अशा एका राजकीय नेत्याची व्यथा सांगणार आहोत, जो आपल्या एका छोट्याश्या कामासाठी नागपूर महापालिकेच्या चकरा मारून मारून दमला आहे, हताश झाला आहे. अवघ्या तीस फुटाच्या सीवर/गडर लाईनसाठी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी एका माजी मंत्र्याला जेरीस आणलं आहे.
यशवंत निकोसे. बहुजन समाज पक्षाचे खंदे कार्यकर्ते. नॅशनल स्कूल ऑफ ड्रामाचे विद्यार्थी. युवा अवस्थेत कांशीराम यांच्यापासून प्रभावित झाल्यानंतर यशवंत निकोसे यांनी घरदार, नोकरी आणि कला-नाट्य क्षेत्रातील त्यांचं करिअर सर्व काही त्यागून बहुजन समाज पक्षासाठी काम सुरु केलं होता. कांशीराम यांच्या विचारांप्रती त्यांची निष्ठा पाहूनच मायावती यांनी आधी यशवंत निकोसे यांना राज्यपाल नियुक्त आमदार बनविले आणि नंतर स्वतःच्या मंत्रिमंडळात यशवंत निकोसे यांना सांस्कृतिक विभागाची स्वतंत्र जबाबदारी सोपविली होती.
2007 ते 2012 दरम्यान निकोसे यांनी उत्तर प्रदेशात मंत्रिपदाची जबाबदारी पार पाडली. कांशीराम यांच्या नंतर हळूहळू बसपाचा चेहरामोहरा बदलत गेल्यामुळे 2017 पासून निकोसे नागपुरात परत आले. 35 वर्षांपूर्वी नागपूरच्या गड्डीगोदाम परिसरात एका झोपडपट्टीत राहणाऱ्या निकोसे यांनी त्याच सोडलेल्या मोडक्या घरात आपलं जीवन पुन्हा सुरु केला. समोर अविवाहित भावाची चॉकलेट बिस्किटांची लहानशी दुकान आणि त्यामागे टिनाच्या शेडमधील मोडकळीस आलेलं घर आहे. काही महिन्यांपूर्वी या परिसरात नागपूर महापालिकेने गल्लीतील रस्त्याचे काँक्रीटीकरण केले. त्यात निकोसे यांच्या घराची सीवर लाईन तुटली. हळूहळू निकोसे यांच्या घरात आणि स्वच्छता घरात घाण पाणी तुंबू लागले. मलमूत्राच्या दुर्गंधीमुळे घरात राहणे कठीण होऊन गेले.
यशवंत निकोसे यांनी स्थानिक नगरसेवकांपासून महापालिकेचे स्थानिक कार्यालयात ( वॉर्ड किंवा झोन ऑफिस ) अनेक लेखी तक्रारी केल्या. काहीच होत नसल्यामुळे महापौर दयाशंकर तिवारी आणि मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांच्याकडे लेखी अर्ज दिले. भेटी घेतल्या. मात्र आश्वासनाच्या पलीकडे काहीच झाले नाही. असेही नाही की निकोसे यांच्या घराची मनपाकडून तुटलेली सीवर लाईन खूप लांबलचक आहे. अवघ्या तीस फुटांच्या लाईनचे काम महापालिकेला अवघ्या काही हजारांच्या खर्चाने करता येते. मात्र, महापालिका एका माजी मंत्र्याला सध्या आमच्याकडे निधी उपलब्ध नाही असे सांगून धीर धरण्यास सांगत आहे. मात्र, घरात आणि पर्यायाने गल्लीत रोज होणारी घाण आरोग्यावर उठल्याने निकोसे यांचा नाईलाज झाला आहे.
परिसरातील नागरिकांनीही महापालिकेच्या नाकर्तेपणामुळे संपूर्ण वस्तीत अस्वच्छता पसरल्याचा आरोप केला आहे. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमुळे आमचे जगणे कठीण होऊन बसल्याचे त्यांचा आरोप आहे. एका माजी मंत्र्याची ही अवस्था पाहून एबीपी माझाने महापौर दयाशंकर तिवारी यांना प्रश्न विचारले तर त्यांनी माजी मंत्री यशवंत निकोसे यांची तक्रार महापालिकांकडे आल्याचे मान्य केले. त्यांच्या घराजवळच्या सीवर लाईनची दुरुस्ती करण्यास अभियंत्याना सांगण्यात आले असून लवकरच ते काम पूर्ण केले जाईल असे आश्वासन महापौरांनी दिले आहे.
आज राजकारणाच्या माध्यमातून छोटे पद मिळवणारे राजकीय कार्यकर्ते ही कोट्यवधींच्या बंगल्यात राहताना आपण पाहतो. मात्र, 5 वर्ष उत्तरप्रदेश सारख्या राज्यात मंत्रिपद भूषविणारे, मंत्री असताना आपल्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या माध्यमातून कोट्यवधींचा निधी विविध कामांसाठी देणारे यशवंत निकोसे अवघ्या तीस-चाळीस हजार रुपयांच्या कामासाठी महापालिकेत अनेक चकरा मारतायेत. तरीही गेल्या अनेक महिन्यात आश्वासनाच्या पलीकडे त्यांच्या पदरात काहीच आलेले नाही. दुर्दैव म्हणजे स्वतःच्या जीवनात नेहमीच प्रामाणिक राहून राजकारणाला स्वच्छ ठेवण्याचा उदाहरण प्रस्तुत करणारे यशवंत निकोसे मात्र स्वतः घाणीत पाहण्यास मजबूर आहेत. मंत्रिपदावर असताना नागपुरात आल्यावर डोक्यावर घेऊन नाचणारे पक्षीय कार्यकर्ते ही आज मदतीला येत नाहीयेत. त्यामुळे वृद्धपकाळात सरकारी कार्यालयातील अनास्थेमुळे यशवंत निकोसे हताश झाले आहे. कोणीतरी न्याय द्या... आणि गरिबीत का होईना मात्र सन्मानाने, स्वछतेने जगू द्या अशी विनवणी ते करत आहेत.