नक्षल्यांचे क्रूर वास्तव! गर्भवती पत्नीसाठी नवऱ्याने पोलिसांची मदत मागितली, संतापलेल्या नक्षल्यांनी पतीसह भावालाही ठार मारलं
Gadchiroli Naxal : माओवाद्यांचा (Naxal) अत्यंत क्रूर चेहरा आणि नक्षलवादी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील आदिवासींवर किती भयावह अत्याचार करतात, याचं कटू सत्य दाखवणारी एक घटना छत्तीसगडमधून समोर आली आहे.
Gadchiroli Naxal गडचिरोली : माओवाद्यांचा (Naxal) अत्यंत क्रूर चेहरा आणि नक्षलवादी त्यांच्या प्रभाव क्षेत्रातील आदिवासींवर किती भयावह अत्याचार करतात, याचं कटू सत्य दाखवणारी एक घटना छत्तीसगडमधून (Chhattisgarh) समोर आली आहे. आदिवासी भागात काम करणाऱ्या जनसंघर्ष समितीने छत्तीसगडमधील सुकमा जिल्ह्यातील पुवर्ती गावाला जेव्हा भेट दिली, तेव्हा एक भयावह सत्य आणि नक्षल्यांचा क्रूर चेहरा परत एकदा समोर आला आहे.
सुकमा जिल्ह्यातील पूवर्ती हे गाव जहाल नक्षल कमांडर आणि माओवाद्यांच्या पीपल्स लिबरेशन गोरिल्ला आर्मीच्या अत्यंत धोकादायक कंपनी 1 चा कमांडर माडवी हिडमाचे गाव आहे. याच पूवर्ती गावात माओवाद्यांकडून ऑगस्ट महिन्यात वेगवेगळ्या तारखांमध्ये एकानंतर एक दोन भावांची हत्या करत त्यांचा संपूर्ण कुटुंब उध्वस्त केलं आहे. पूवर्ती गावातील सीताराम सीताराम या 19 वर्षीय तरुणाची गर्भवती पत्नी राहत्या घरात नियमित घरकाम करताना पडली आणि अत्यवस्थ झाली. दुपारपर्यंत तीला जवळच्या रुग्णालयात नेण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्याने अखेर सीताराम ओयम याने पोलिसांची मदत घेण्यासाठी जवळचे पोलिस ठाणे गाठले.
दरम्यान, पोलिसांनी ठाण्यात शक्य असलेले प्रथमोपचार केल्यानंतर वाहनाची व्यवस्था करून जवळच्या रुग्णालयात पाठवले. परंतु, आधीच बराच उशीर झाला असल्याने सीताराम ओयमच्या पत्नीने प्राण सोडले. तीचे अंत्यसंस्कार झाल्यानंतर चार-पाच दिवसांनी माओवाद्यांनी सीताराम ओयमचे घार गाठले आणि तू पोलिस ठाण्यात मदत का मागीतली, असा सवाल विचारत सीताराम ओयमची निर्घुण हत्या केली.
माओवाद्यांकडून संपूर्ण कुटुंब उध्वस्त
त्यानंतर सीताराम ओयमचा 16 वर्षीय लहान भाऊ शंकर ओयम हा आपल्या वहिनीच्याच तेरवीसाठी पूवर्तीला आला. दरम्यान, शेजारच्या जिल्ह्यात आश्रम शाळेत शिकत असलेला शंकर गावात शालेय गणवेषात आला असल्याने माओवाद्यांनी तो राग मनात धरला. काही दिवसांनी रागापोटी माओवाद्यांनी रात्रीच्या वेळेला शंकर गावातील घरी झोपलेला असताना बाहेर बोलावले आणि अंधारात नेत लाठी-काठ्यांनी मारून त्याची हत्या केली आणि मृतदेह गावाचे वेशीवर निर्जन स्थानी फेकून दिले. सकाळी गावकऱ्यांनी पाहिल्यानंतर ही घटना उजेडात आली.
15 ऑगस्टला पूवर्तीमध्ये पहिल्यांदाच झेंडा वंदन
विशेष म्हणजे, ओयम आणि शंकर ही दोन्ही भावंड हुशार व शिक्षण घेत होती. त्याचाच राग माओवाद्यांना होता. त्यांच्या भीतीने ओयम कुटूंब पूवर्ती सोडून दंतेवाडा जिल्ह्यातील पालनार येथे स्थलांतरित झाले होते. परंतु, ओयम सीताराम याने पूवर्ती येथील तरुणीसोबत प्रेमविवाह केल्याने आणि ती गर्भवती असल्याने तो पूवर्ती गावात आला होता. भारताच्या स्वातंत्र्यानंतर याच वर्षी 15 ऑगस्टला पूवर्तीमध्ये पहिल्यांदाच भारताचा राष्ट्रध्वज फडकवण्यात आला होता. त्याचाही राग माडवी हिडमा या माओवाद्यांच्या टॉप कमांडरच्या मनात होता आणि त्याचा बदला माओवाद्यांनी सिताराम पोएम आणि शंकर ओयम या दोन्ही भावंडाची हत्या करून घेतला आहे.
माओवाद्यांकडून होणाऱ्या निष्पापांच्या हत्येवर कथित मानवआधिकार गप्प का?
माओवाद्यांकडून दंडकारण्यात होत असलेल्या घातपाताच्या घटना नवीन नाही. नक्षल्यांकडून निष्पापांच्या हत्येचे अनेकदा क्रूर वास्तव पुढे आले आहे. मात्र, या घटनांचा बीमोड करताना पोलीस कारवाई अथवा नक्षल्यांच्या हत्येबाबत प्रश्न उपस्थित करून जाब विचारणारे कथित मानवआधिकार अशा निष्पापांच्या हत्येवर गप्प का? एरवी नक्षल्यांच्या हत्येबाबत कळवळा व्यक्त करणारे हेच कथित लोक अशा घटनांमध्ये का प्रश्न अथवा आक्षेप नोंदवत नाही? असा सवाल आता नागरिकांकडून विचारला जाऊ लागला आहे.
हे ही वाचा