Breaking News LIVE: शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई
Breaking News LIVE Updates, 18 April 2021: दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये आपल्याला मिळतील. देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाचे अपडेट लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
रेमडेसिवीर इंजेक्शनवरून हाय व्होल्टेज ड्रामा; मध्यरात्री देवेंद्र फडणवीस पोलीस ठाण्यात
मुंबई : रेमडेसिवीर इंजेक्शनच्या तुटवड्यावरुन दुपारपासून केंद्र विरुद्ध राज्य अशी लढाई सुरु होती. नवाब मलिक यांनी केंद्र सरकारवर आरोप केल्यानंतर केंद्र सरकारनेही नवाब मलिक यांना प्रत्युत्तर दिलं. पण ही लढाई रात्री थेट पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचली. Bruck Pharma कंपनीच्या संचालकांना दहा पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यांच्याकडे रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर चौकशीसाठी पोलीसांनी त्यांना पार्ले येथील पोलीस ठाण्यात घेऊन आले. ही माहिती विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर आणि आमदार प्रसाद लाड यांना मिळाली. त्यानंतर लगेच देवेंद्र फडणवीस यांनी पार्ले येथील पोलीस ठाण्यात धाव घेतली. यावेळी पार्ले पोलीस स्टेशनमध्ये देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांमध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
शाब्दिक वादानंतर भाजपचे नेते आणि पोलीस अधिकारी बीकेसीतील पोलीस उपायुक्त कार्यालयात पोहोचले. पोलीस कार्यालयात देवेंद्र फडणवीस तासभर ठाण मांडून बसले होते. पोलीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा झाल्यानंतर अखेर पोलिसांनी फार्मा कंपनीच्या मालकांना सोडून दिल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांना दिली आहे. भाजपला इंजेक्शनचा साठा कसा देता? यावरून मंत्र्यांच्या ओएसडीकडून Bruck Pharma कंपनीच्या लोकांना धमकावल्याची माहितीही देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
महानगरपालिकेच्या 6 रुग्णालयांमधील 168 कोरोना बाधित रुग्णांचे स्थलांतर, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे प्रशासनाचा निर्णय
कोरोना बाधित रुग्णांची संख्या संपूर्ण देशात वाढली असून त्यामुळे रुग्णांना प्राणवायू (ऑक्सिजन) पुरवठा करण्याची गरज मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सहा रुग्णालयांमधील 168 रुग्णांचे ऑक्सिजन उपलब्ध असलेल्या इतर कोविड रुग्णालयांमध्ये सुरक्षितरित्या स्थलांतर करण्यात आले आहे. ऑक्सिजन पुरवठा सुरळीत राहण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका सर्वतोपरी प्रयत्न करत आहे.
दरम्यान, मुंबई महानगरपालिका हद्दीतील सर्व 24 प्रशासकीय विभागात प्राणवायू पुरवठा सुरळीत राखता यावा म्हणून, अन्न व औषध प्रशासन तसेच ऑक्सिजन उत्पादक आणि संबंधित सहायक आयुक्त यांच्यासमवेत समन्वय साधण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने सहा समन्वय अधिकारी नुकतेच नियुक्त करण्यात आले आहेत. हे समन्वय अधिकारी 24x7 या स्वरूपात कार्यरत राहणार आहेत. यामुळे ऑक्सिजन पुरवठ्या बाबतची अडचण लागलीच निकाली निघण्यास मोलाची मदत होत आहे. भविष्यातही ऑक्सिजन पुरवठ्या संबंधी अशी कोणतीही अडचण उद्भवणार नाही, याची पूर्ण खबरदारी महानगरपालिका प्रशासनाने घेतली आहे.
दिलासादायक बातमी! रेमडेसिवीरच्या किंमती घटल्या
नवी दिल्ली : राष्ट्रीय औषध निर्धारण प्राधिकरणाने शनिवारी सांगितलं की सरकारच्या हस्तक्षेपानंतर औषधं निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी रेमडेसिवीरच्या किंमतीत घट केली आहे. कोरोनाच्या उपचारामध्ये रेमडेसिवीर इंजेक्शन महत्वाची भूमिका बजावते. सरकारने रेमडेसिवीर निर्मिती करणाऱ्या कंपन्यांची एक बैठक घेतली. त्यामध्ये कॅडिला हेल्थकेयर, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी आणि सिप्ला या आघाडीच्या कंपन्यांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या (100 मिग्रॅ) किंमतीमध्ये घट करण्याचा निर्णय घेतलाय.
कंपन्यांच्या या निर्णयामुळे आता कॅडिला कंपनीच्या रेमडेसिवीरच्या किंमती आता 2800 रुपयांवरुन 899 रुपये इतकी होणार आहे. तसेच सिंजीन इंटरनॅशनलच्या रेमविन नावाने तयार होत असलेल्या रेमडेसिवीरची किंमत आता 3950 वरुन आता 2450 रुपये झाली आहे. डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी च्या रेमडेसिवीरची किंमत आता 5400 वरुन आता 2700 रुपये इतकी होणार आहे तर सिप्लाच्या रेमडेसिवीरची किंमत 4000 वरुन 3000 रुपये इतकी होणार आहे. माइलान कंपनीने आपल्या रेमडेसिवीरची किंमत कमी करुन ती 3400 रुपये इतकी केली आहे. या आधी ती 4800 रुपये होती.
उल्हासनगरच्या माजी आमदार ज्योती कलानी यांचं निधन
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या सभेत कोरोना नियमांचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवून दंडात्मक कारवाई
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र एकीकरण समितिचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी बेळगावात रॅली काढून संयुक्त महाराष्ट्र चौकात जाहीर सभा घेतली होती.या सभेला अभूतपूर्व प्रतिसाद लाभला होता.पोलिसांनी अनेक कारणे दाखवून सभेला आक्षेप घेण्याचा प्रयत्न केला पण सभेला आवश्यक परवानगी घेतल्याची कागदपत्रे दाखवल्यावर पोलिसांना गप्प बसावे लागले.सभेत मास्क घातले नव्हते,सोशल डिस्टन्सिंग पाळले गेले नसल्याचा ठपका सभेच्या आयोजकांवर ठेवून प्रशासनाने एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई केली आहे.
पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून हत्या करत बापाची त्याच ट्रकखाली आत्महत्या
पोटच्या दोन मुलींच्या अंगावर ट्रक घालून हत्या करत बापाने त्याच ट्रकखाली आत्महत्या केली आहे. ही धक्कादायक घटना पुण्याच्या मावळमध्ये मध्यरात्री एक वाजता घडली. मोठ्या मुलीचे प्रेमसंबंध सुरू आहेत, या संशयावरून अख्खं कुटुंब संपविण्याचा प्रयत्न बापाने केला. सुदैवाने लहान मुलगी आणि पत्नी यातून बचावल्या आहेत. भरत भराटे असं निर्दयी मृत बापाचे नाव आहे तर 18 वर्षीय नंदीनी आणि 14 वर्षीय वैष्णवी या दोन्ही मुलींची त्याने हत्या केली. या घटनेपूर्वी बापाने एक चिठ्ठीही लिहून ठेवलेली आहे. त्यात मुलीच्या प्रेमसंबंधांचा उल्लेख करत अख्खं कुटुंब संपवित असल्याचं नमूद आहे.
फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात हस्तक्षेप केला- गृहमंत्री दिलीप वळसे
फडणवीसांनी पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न केला, सरकारी कामात हस्तक्षेप केला, गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांची प्रतिक्रिया, येत्या दिवसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी निर्णय घेतला जाऊ शकतो. रेमडेसिवीरसंदर्भात पोलिसांजवळ इनपुट्स होते, वळसे पाटलांची माहिती.
बार्शीतील सराफ व्यापाऱ्याचे पोलिस निरीक्षकाविरोधात धक्कादायक आरोप
बार्शीतील एका सराफ व्यापाऱ्याने एका पोलिस निरीक्षका विरोधात धक्कादायक आरोप केले आहेत. बार्शीतील पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पाच लाख रुपयांची मागणी केल्याचा धक्कादायक आरोप सराफ व्यापारी अमृतलाल गुगळे यांनी केला आहे. अमृतलाल गुगळे यांचा आरोप करणारा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर वायरल होतोय. दुकानात मार्च एंडिंग ची कामे सुरू असताना काही पोलीस दुकानात आले त्यांनी मला पोलिस चौकीत नेले. त्या ठिकाणी पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी पाच लाख रुपये द्या. गृहमंत्र्यांपर्यंत आम्हाला हफ्ते द्यावे लागतात, पैसे द्या अन्यथा आपल्या विरोधात खोटे गुन्हे दाखल करू अशी धमकी दिल्याचा आरोप देखील सराफ व्यापारी गुगळे यांनी केला आहे. पैसे देण्यास मनाई केल्यानंतर दुकान सील करण्यात आल्याचा आरोप ही या सराफ व्यापाऱ्याने या व्हिडिओत केला आहे.
दरम्यान या संदर्भात आम्ही पोलीस निरीक्षक गिरीगोसावी यांच्याशी फोनवरून संपर्क केला. लॉकडाउन असताना देखील गुगळे यांचे दुकान सुरू असल्याचे सोशल मीडियावर वायरल होत होते. त्यानुसार पोलिसांनी जाऊन तपासणी केली. तेव्हा दुकान आतून सुरू असल्याचे आढळून आले. त्यामुळे गुगळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्याने त्यांनी खोटे आरोप केले आहेत. अशी प्रतिक्रिया पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांनी एबीपी माझाला फोनवरून दिली आहे.