Nagpur Crime : 'मेट्रोमोनियल' साईटवरुन लावला पाच लाखांचा चुना; लग्नाचं आमिष दाखवत अत्याचारही केला!
पीडिता काही दिवसांपूर्वी भोपाळला गेली. तेथे माहिती झाले की, आकाश आधीपासूनच विवाहित आहे आणि त्याला मुलगाही आहे. तसेच तो रेल्वेत नोकरीलाही नाही. पीडितेने जाब विचारला असता आकाशने तिला हाकलून लावले.
Nagpur News : मेट्रोमोनियल साईटच्या माध्यमातून एका ठगबाजाने शहरातील तरुणीशी संपर्क केला. रेल्वेत लोकोपायलट असल्याची थाप मारून लग्न पक्के केले. हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. आर्थिक अडचणीत असल्याचे सांगत तिच्याकडून 5 लाख रुपये घेतले आणि नंतर सर्व संपर्क तोडले. पीडितेने गणेशपेठ पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी 29 वर्षीय पीडितेच्या तक्रारीवरून आकाश अनिल जाधव (31) रा. भोपाळ विरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.
पीडित तरुणी व्यवसाय करते. लग्नासाठी तिने मेट्रोमोनियल संकेतस्थळावर आपला प्रोफाईल तयार केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात आकाशने पीडितेशी संपर्क केला. मेट्रोमोनियल साईटवर प्रोफाईल पाहिल्याचे सांगत लग्नाचा प्रस्ताव मांडला. आकाशने पीडितेला रेल्वेत लोकोपायलट असल्याचे सांगितले होते. दोघांमध्ये बोलचाल सुरू झाली. तो पीडितेला भेटायला नागपुरात आला आणि लग्न पक्के केले. काही दिवसांनी तो पुन्हा नागपूरला आला. गणेशपेठ ठाण्यांतर्गत (Ganeshpeth Police Station) एका हॉटेलमध्ये खोली बुक केली. पीडितेला भेटायला बोलावले आणि शारीरिक संबंधासाठी बळजबरी करू लागला. पीडितेने विरोध केला असता लग्न करण्याचा विश्वास दिला.
आधीपासूनच होता विवाहित
लग्नाची सर्व बोलणी झाल्यानंतर आकाशने सांगितले की, नोकरीमुळे तो वारंवार नागपूरला येऊ शकत नाही. त्यामुळे नागपुरातच बदली करून घेणार आहे. मात्र त्यासाठी 5 लाख रुपयांची आवश्यकता आहे. इतके पैसे सध्या त्याच्याकडे नाहीत. पीडितेने त्याच्यावर विश्वास करून 5 लाख रुपये दिले. पैसे मिळाल्यानंतर आकाशने पीडितेशी सर्व प्रकारचे संपर्क तोडले. यामुळे त्याच्याबाबत माहिती काढून पीडिता काही दिवसांपूर्वी भोपाळला गेली. तिथे माहिती झाले की, आकाश आधीपासूनच विवाहित आहे आणि त्याला एक मुलगाही आहे. इतकेच नाहीतर तो रेल्वेत नोकरीलाही नाही. पीडितेने जाब विचारला असता आकाशने तिला हाकलून लावले. पीडितेने नागपूरला परतून पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी आकाशवर लैंगिक अत्याचार आणि फसवणुकीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
इतर महत्त्वाची बातमी