मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा
2016 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांनी 40 फूटांवर हंडी उभारली होती. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला.
मुंबई : मनसे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांना मुंबई उच्च न्यायालयानं मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. साल 2016 मधील दहीहंडीशी संबंधित प्रकरणात हा दिलासा देण्यात आला आहे. दहीहंडी उभारताना घालून देण्यात आलेल्या मर्यादेचं उल्लंघन केल्याप्रकरणी आयोजक या नात्यानं या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र याप्रकरणी आता अटक झाल्यास त्यांची 25 हजारांच्या जातमुचलक्यावर सुटका करण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.
गोपालकाला हा पारंपारीक उत्सव साजरा करताना जागोजागी उभारण्यात येणाऱ्या दहींदंड्या फोडण्यासाठी उंच मानवी मनोरे उभे राहतात. मात्र त्यात अनेकदा गोविंदा गंभीर जखमी होतात. त्यामुळे काही वर्षांपूर्वी त्यावर निर्बंध लादत 20 फूटांच्यावर हंडी लावण्यात मनाई करण्यात आली होती. तसं असतानाही साल 2016 मध्ये ठाणे जिल्ह्यातील मनसेचे नेते अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांनी 40 फूटांवर हंडी उभारली होती. त्यामुळे नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात रितसर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी जाधव आणि पानसे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज ठाणे जिल्हा न्यायालयानं फेटाळून लावला होता. त्यानंतर या दोघांनी मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेतली होती.
या अर्जावर न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या एकलपीठासमोर मंगळवारी सुनावणी पार पडली. न्यायालयानं घालून दिलेल्या अटी शर्तींचे उल्लंघन केल्यामुळे त्यांना पोलीस ठाण्यात हजर राहण्यास सांगितलं गेलं होतं. मात्र, दोघेही पोलिसांसमोर हजर झालेच नाहीत म्हणूनच त्यांना दिलासा देण्यास ठाणे सत्र न्यायालयानं नकार दिल्याचं सरकारी वकिलांकडून हायकोर्टाला सांगण्यात आलं. त्यावर साल 2016 मधील हे प्रकरण असताना गुन्हा दाखल झाल्यापासून तपास अधिकाऱ्यांनी यात कोणतीही कारवाई केलेली नाही. आता अचानक या दोघांना पोलीसांकडून नोटीस बजावण्यात आली त्यामुळे प्रथमदर्शनी हे एक राजकीय षडयंत्र दिसून येत आहे. त्यामुळेच अटक होण्याच्या भीतीपोटी हे दोघेही पोलिसांसमोर हजर झाले नाहीत असा युक्तिवाद जाधव आणि पानसे यांच्यावतीनं करण्यात आला. त्यांचा युक्तिवाद ग्राह्य धरत हायकोर्टानं अविनाश जाधव आणि अभिजीत पानसे यांची ही याचिका मान्य करत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला.