पुण्यातील बोगस डॉक्टर मुळचा नांदेडचा रहिवाशी, दोन वर्षांपासून चालवत होता 22 बेडचं हॉस्पिटल
मेहबूब शेख असं आरोपीचं नाव आहे. तो नांदेडमधील एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होता. तिथे उपचार पद्धतीची माहिती झाल्यावर त्याने महेश पाटील नावानं बनावट डिग्री दाखवून मोरया हॉस्पिटल चालवायला सुरुवात केली.

नांदेड : जिल्ह्यातील रहिवाशी असलेल्या डॉक्टरांच्या हाताखाली काम करणाऱ्या एका कपांऊडरने पुणे येथे स्वतःचंच मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल सुरु केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे 22 बेडचे हे हॉस्पिटल मागील दोन वर्षांपासून सुरु आहे. कपांऊडरने बोगस नाव आणि बनावट वैद्यकीय पदवी तयार करून हे हॉस्पिटल सुरु केलं होतं. कोविड रुग्णांसाठी त्याने स्वतंत्र वार्डही तयार केला होता, अशी माहिती पोलिसांच्या तपासातून समोर आली आहे. पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये हे रुग्णालय चालवलं जात होतं. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तो मूळचा नांदेड जिल्ह्यातील असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे.
पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला कपांऊडरचं बोगस डिग्री आणि नाव बदलून रुग्णालय चालवत असल्याची माहिती मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चौकशी केली असता डॉ. महेश पाटील नावाने आरोपी रुग्णालय चालवत असल्याचं समोर आलं. त्याच्याकडे एमबीबीएस डिग्री असल्याचं आढळून आलं. पोलिसांनी अधिकची चौकशी केल्यानंतर डॉ. महेश पाटील याचं मूळ नाव मेहबूब शेख असून, तो नांदेड जिल्ह्यातील पीरबुऱ्हाण नगरचा रहिवासी असल्याचं उघड झालं. संपूर्ण चौकशीनंतर पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.
मेहबूब शेख ते डॉ. महेश पाटील बोगस डॉक्टरचा प्रवास
शिरूरमध्ये डॉक्टर असल्याचं दाखवून 22 बेडचं स्वतः रुग्णालय चालवणाऱ्या कंपाऊडरची पोलिसांनी चौकशी केल्यानंतर त्याने संपूर्ण माहिती दिली. याविषयी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट म्हणाले, "पोलिसांनी केलेल्या तपासातून समोर आलं की, मेहबूब शेख हा कपांऊडर म्हणून काम करायचा. नांदेडमधील एका हॉस्पिटलमध्ये तो कामाला होता. काम करत असताना त्याला असं वाटलं की, वैद्यकीय कौशल्य आपण शिकलो आहोत. त्यानंतर त्याने शिरूरमध्ये दोन वर्षांपूर्वी मौर्या मल्टीस्पेशालिटी रुग्णालय सुरु केलं. त्यासाठी त्याने एमबीबीएसची बनावट डिग्री तयार केली आणि नावही बदललं. त्याने बनावट डिग्री आणि आधार कुठून मिळवलं याचा तपास आम्ही करत आहोत. महत्त्वाचं म्हणजे काही काळ त्याने कोविड रुग्णांसाठी स्वतंत्र वार्डही सुरु केल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे." असं घनवट यांनी सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
दरम्यान, बोगस डॉक्टरने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केलेत तर काहींवर अजूनही सुरु आहेत. मात्र त्याने उपचार करताना केलेली लुटालूट रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर आणणारी आहे. यातल्या काही नातेवाईकांनी आपला अनुभव सांगितला. सध्या हा मुन्नाभाई पोलिसांच्या ताब्यात आहे. या बारावी नापास मेहबूबला डॉ. महेश पाटील बनण्यासाठी कुणी मदत केली याचाच शोध पोलीस घेत आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
पुण्याचा 'मुन्नाभाई'! बारावी नापास बोगस डॉक्टर दोन वर्षांपासून चालवत होता 22 बेडचं हॉस्पिटल























