पुण्याचा 'मुन्नाभाई'! बारावी नापास बोगस डॉक्टर दोन वर्षांपासून चालवत होता 22 बेडचं हॉस्पिटल
मेहबूब शेख असं आरोपीचं नाव आहे. तो नांदेडमधील एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होता. तिथे उपचार पद्धतीची माहिती झाल्यावर त्याने महेश पाटील नावानं बनावट डिग्री दाखवून मोरया हॉस्पिटल चालवायला सुरुवात केली.
पुणे : डॉक्टरची एक चूक रुग्णाच्या जीवावर बेतू शकते. मात्र डॉक्टरच चुकीचा असेल म्हणजेच बोगस असेल तर रुग्णांचं काय होईल? कारण पुण्यात एक बोगस डॉक्टर गेल्या दोन वर्षांपासून मोठं हॉस्पिटल चालवत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बारावी नापास असणाऱ्या या डॉक्टरने अनेकांची उपचाराच्या नावाखाली मोठी फसवणूक केली आहे.
राज्यात कोरोना लाटेत आरोग्य यंत्रणा मोडकळीस आली असताना पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे दोन वर्षांपासून एक बोगस डॉक्टर 22 बेडचं हॉस्पिटल चालवत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या बोगस डॉक्टरने कोविड रुग्णांसाठी स्पेशल वार्ड बनवून तिथे कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मेहबूब शेख असं आरोपीचं नाव आहे. तो नांदेडमधील एका डॉक्टरकडे कंपाऊंडर म्हणून काम करत होता. तिथे उपचार पद्धतीची माहिती झाल्यावर त्याने महेश पाटील नावानं बनावट डिग्री दाखवून मोरया हॉस्पिटल चालवायला सुरुवात केली. मात्र या प्रकरणात त्याला साथ देणाऱ्या पार्टनरसोबत वाद झाल्यानंतर हे प्रकरण पोलिसात गेलं आणि मेहबूब उर्फ महेशचा भांडाफोड झाला.
या बोगस डॉक्टरने अनेक कोरोना रुग्णांवर उपचार केलेत तर काहींवर अजूनही सुरू आहेत. मात्र त्याने उपचार करताना केलेली लुटालूट रुग्णांच्या नातेवाईकांना अक्षरशः रस्त्यावर आणणारी आहे. यातल्या काही नातेवाईकांनी आपला अनुभव सांगितला. सध्या हा मुन्नाभाई पोलिसांच्या ताब्यात आहे. या बारावी नापास मेहबूबला डॉ. महेश पाटील बनण्यासाठी कुणी मदत केली याचाच शोध पोलीस घेत आहे.