(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aurangabad : औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा ठराव
Aurangabad To Sambhajinagar : औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रीत आहे.
Aurangabad To Sambhajinagar : औरंगाबाद की संभाजीनगर यावरून गेल्या 30 वर्षांपासून औरंगाबादचं राजकारण केंद्रीत आहे. शिवसेनेच्या वतीने संभाजीनगरची हाक दिली होती. सत्तेत आल्यानंतर संभाजीनगर नामकरण करणार असं आश्वासन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले होतं. गेल्या दोन वर्षांपासून औरंगाबादचं नामकरण संभाजीनगर करण्यासाठी हालचाली सुरू झाल्याचेही दिसून आले. यात आता भाजपनेही उडी घेतली आहे. औरंगाबाद जिल्हा परिषदच्या सर्वसाधारण सभेत सोमवारी औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करावं, असा ठराव मांडण्यात आला. भाजपच्या जिल्हा परिषद सदस्यांनी हा प्रस्ताव मांडला. यापूर्वी औरंगाबाद महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्यात आला आहे.
सोमवारी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मीना शेळके यांच्या अध्यक्षतेखाली औरंगाबाद जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा झाली. या सभेत औरंगाबादचे नाव हे संभाजीनगर करावे, असा ठराव भाजपचे जिल्हा परिषद सदस्य मधुकर वातुरे यांनी मांडला. यावर उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड यांनी अनुमोदन दिले. यावर शिवसेनेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे यांनी सांगितले की, औरंगाबाद शहरातील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज हे नाव देण्याचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. तो केंद्र सरकारने मंजुरीसाठी प्रलंबित आहे. मराठवाड्यात दोन केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी हे ठराव मंजूर करून घ्यावेत असा उलट टोला लगावला, त्यामुळे औरंगाबाद की संभाजीनगर नावावरून शिवसेना आणि भाजपमध्ये वाकयुद्ध सुरू होणार असे दिसते.
औरंगाबाद जिल्हा परिषदेची मुदत फेब्रुवारीमध्ये समाप्त होणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद मार्फत विविध प्रलंबित कामे तसेच निधी नियोजनाच्या विषय सभा संपन्न झाली. त्यात औरंगाबाद की संभाजीनगर याच मुद्द्यावर अधिक चर्चा झाली. त्यामुळे आता पुन्हा निवडणुकीच्या तोंडावर महानगरपालिका सोबतच जिल्हा परिषदेमध्ये औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा गाजणार जवळपास स्पष्ट दिसतंय.
औरंगाबाद शहराच्या नावाचा इतिहास काय ?
या शहराचं नावाजलेलं नाव म्हणजे खडकी, हा परिसर बेसाल्ट खडकावर वसलेला आहे त्यात शहरात अगदी प्राचिन असे खडकेश्वर महादेवाचं मंदिर आहे याच नावावरून या शहराचे नाव खडकी पडले असावे असं इतिहासात नोंद आहे. त्याकाळी या शहराचा राजा मलिक अंबर होता ख-या अर्थानं नहरे ए अंबरी सारख्या पाणीपुरवठ्याच्या आधुनिक वास्तू उभारून त्यानं या गावाचं शहर केलं मात्र त्यानंही या खडकी नावात कुठलाही बदल केला नाही, कालांतरानं 1633मध्ये मलिक अंबरचा मुलगा फतेह खान या शहराचा राजा झाला आणि त्यानं आपल्या नावावरून या शहराचे नाव फतेहनगर असे ठेवले. 1653 मध्ये औरंगजेब डेक्कन विभागाचा सुभेदार म्हणून औरंगाबादेत आला त्यानं पुन्हा या शहराचं नाव फतेहनगर वरून खुजिस्ता बुनियाद असे ठेवले, कालांतराने हे नाव सुद्धा बदलण्यात आले आणि त्यानंतर या शहराला सध्याचे आहे हे औरंगाबाद हे नाव मिळालं. ब्रिटीश काळातही हेच नाव कायम राहिले.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha