मंत्री मकरंद पाटलांच्या स्वागताला भाजपचा एकही आमदार नाही, पालकमंत्रीपदावरुन बुलढाण्यात नाराजीनाट्य?
पालकमंत्री मकरंद पाटील यांच्या स्वागताला बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचे एकही आमदार आले नाहीत. त्यामुळं पालकमंत्रीपदावरुन नाराजीनाट्य आहे का? अशी चर्चा सुरु आहे.
Makarand Patil : राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील (Makarand Patil )यांनी बुलढाणा जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी शेगाव येथील संत गजानन महाराज समाधीचे दर्शन घेतलं. मात्र, यावेळी त्यांच्या स्वागताला बुलढाणा जिल्ह्यातील भाजपचा एकही आमदार आला नाही. जिल्ह्यात भाजपचे चार आमदार आहेत. यापैकी एकही आमदार हजर नव्हते. त्यामुळं पालकमंत्री पदावरुन बुलढाण्यात नाराजी नाट्य असल्याची चर्चा सुरु आहे.
बुलढाणा जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे चार आमदार आहेत. मात्र, पालकमंत्रीपद एकच आमदार असलेले राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाला देण्यात आले आहे. त्यामुळं कुठेतरी महायुतीत नाराजी तर नाही ना...? असा सवाल उपस्थित केला जातोय. बुलढाण्यातील चार आमदारांपैकी एकही आमदार नवीन व पहिल्यांदा आलेल्या पालकमंत्र्यांच्या स्वागतासाठी गैरहजर का? त्यामुळे बुलढाण्यात भाजपचे आमदार नाराज तर नाहीत ना.? जिल्ह्यात आता महायुतीत बेबनाव तर नाही ना अशा चर्चा सुरू आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्याच पालकमंत्री पद मिळाल्यामुळं मी आनंदी
आमदार नरहरी झिरवाळ यांनी केलेल्या वरक्तव्याबद्दल देखील त्यांना विचारण्यात आलं, यावेळी ते म्हणाले की, ज्यावेळी पक्षाच शिबिर शिर्डीला झालं त्यावेळी अजित दादांच्या समोर पालकमंत्री पदाबाबद सगळ बोलणं झालं आहे. त्यामुळं ते का बोलले हे त्यांनाच माहित असल्याचे मकरंद पाटील म्हणाले.
एका जिल्ह्यात अनेक मंत्री आहेत, त्यामुळं एकाला कुणाला तरी पालकमंत्री पद मिळेल. मला ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या जिल्ह्याच पालकमंत्री पद मिळाले, मी आनंदी असल्याचे पाटील म्हणाले. आपल्या स्वागताला बुलढाण्यातील चार भाजपाचे आमदार आहेत. मात्र, एकही आलेले नाहीत. महायुतीत नाराजी आहे? असा सवाल देखील त्यांना केला. यावेळी ते म्हणाले की, अस नाही काल मला भाजपाच्या आमदार श्वेता महाले भेटल्या होत्या. इतर कुठे आहेत मला माहिती नाही. भाजपाच्या कार्यकर्त्यांनीही माझं स्वागत केल्याचे मकरंद पाटील म्हणाले.
रायगड आणि नाशिक जिल्ह्यातही पालकमंत्रीपदावरुन नाराजीनाट्य
पालकमंत्रीपदावरुन अनेक जिल्ह्यात नाराजीनाट्य असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यामध्ये रायगड आणि नाशिक जिल्ह्यांचा देखील समावेश आहे. रायगड जिल्ह्यात आदिती तटकरे यांच्याकडू पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, शिवसेना शिंदे गटाचा वाढता विरोध पाहता ही नियुक्ती रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर नाशिक जिल्ह्याची जबाबदारी ही गिरीश महाजन यांना देण्यात आली होती. मात्र, ही नियुक्ती देखील रद्द करण्यात आली आहे.